धक्कादायक ! सर्प 'मित्रच' ठरला मित्राचा कातील? वाढदिवस साजरा करताना हातात दिला विषारी साप; सर्पदंशाने युवकाचा मृत्यू! चिखलीतील घटना..
Jul 9, 2024, 11:02 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखलीतून अतिशय धक्कादायक बातमी समोर येते आहे. सर्पमित्राने मित्राच्या वाढदिवशी त्याच्या हातात विषारी सर्प देण्याचा प्रयत्न केला. यात सर्पदंश झाल्याने अत्यवस्थ झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल ८ जुलैच्या दुपारी उघडकीस आली.
मृतक युवकाच्या वडिलांनी सोमवारी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
घटना ५ जुलै रोजी संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. चिखलीतील गजानन नगर येथील रहिवासी संतोष जगदाळे (३१ वर्ष) याचा त्यादिवशी जन्मदिवस होता. गजानन नगर येथील त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते. संतोषचा वाढदिवस करायचा म्हणून मित्रांनी संतोषला बाहेर आणले. यावेळी त्याचा मित्र आरिफ खान रहीस आणि धीरज पंडितकर हे देखील तिथे उपस्थित होते. आरिफ हा सर्पमित्र असून तो नेहमी विविध प्रकारचे साप वागवतो.
संतोष जगदाळे याचा वाढदिवस साजरा करत असताना आरिफ व धीरजने त्यांच्या जवळील विषारी साप संतोषच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. यात सर्पदंश झाल्याने संतोष अत्यवस्थ पडला. यात त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. या धक्कादायक घटनेनंतर मृतक संतोष जगदाळे याच्या वडिलांनी काल चिखली पोलीस ठाणे गाठून सगळी हकीकत सांगितली. यावरून, पोलिसांनी आरिफ खान रहिस, धीरज पंडितकर (रा. गजानन नगर चिखली) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. दोघेही संतोषच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागवतकर करीत आहेत.