धक्कादायक! तुमची - आमची झोप उडवणारी बातमी;बुलडाणा जिल्हा बनतोय गुन्हेगारांचा अड्डा; साडेचार महिन्यात १७ खून; २४ बलात्कार! ६४ दंगली; १२ जणांना झाला दुनियेतून उठवण्याचा प्रयत्न;

४४ अल्पवयीन मुलींचे किडनॅपिंग! विचार करा..आपली लेकरं - बाळ खरचं किती सुरक्षित?
 
fh

बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या आठवड्यात चिखली तालुक्यातील तपोवन देवी संस्थान परिसरात जिल्हाच नव्हे अख्या राज्याला हादरवून सोडणारी घटना घडली. आई सोबत लग्नाला आलेल्या ६ वर्षीय चिमुकलीचे एका नराधमाने अपहरण केले, त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिचा मृतदेह दगडाची पाळ रचून त्याखाली दाबून टाकला. घटनेच्या ४ - ५ दिवसांतच जिल्हा पोलिसांनी आरोपी सदानंद रोडगे याला अटक केली, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या घटनेनंतर प्रत्येकच लग्नात, कार्यात माय - माऊल्या आपल्या चिल्ल्या - पाल्यांना क्षणभरही डोळ्यासमोरून जाऊ देत नाहीत. रोहडा येथील त्या विकृत सद्या सारखे कितीतरी नराधम समाजात आजूबाजूला वावरत असतात, सामान्य माणसासारखे दिसणारे ते अनेकदा एवढे विकृत असतील असे ओळखू येत नाहीत.मात्र अशा घटना घडल्यानंतर "अरेच्चा तो एवढा वाईट असेल असं वाटलं नव्हत" अस म्हणण्याची वेळ आपल्यावर येते. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या गुन्हेगारी जगताचा बुलडाणा लाइव्ह ने आढावा घेतला. यावेळी तुमची आमची झोप उडेल अशीच धक्कादायक अन् तेवढीच चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.

  १ जानेवारी २०२३ ते आजच्या तारखेपर्यंत जिल्ह्यात ४ हजारापेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, अपहरण, फसवणूक,दंगली यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ३३ पोलीस स्टेशन मध्ये हे विविध गुन्हे दाखल झाले आहेत. जिल्ह्यात साडेचार महिन्यात १७ खून झाल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे, यापैकी १५ प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. याशिवाय १२ जणांना दुनियेतील उठवण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्यावर प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय साडेचार महिन्यात २४ बलात्कार झाल्याच्या घटना घडल्यात, विशेष म्हणजेच बलात्कार प्रकरणातील सर्वच आरोपी जेरबंद करण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे.

  ४४ अल्पवयीन मुलींना उचलले..!

१ जानेवारी ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत झालेल्या अपहरणाच्या घटनांचा आकडा सुद्धा विचार करायला भाग पाडणारा आहे. या कालावधीत तब्बल ४४ अपहरणाच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. ०१ ते १८ वर्षाखालील कोणतीही व्यक्ती गायब होते तेव्हा पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. तपोवन देवी येथील खून प्रकरणात देखील पोलिसांनी आधी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर खून आणि शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर बलात्काराचे कलम पोलीस त्या गुन्ह्यात समाविष्ट केले होते. ४४ पैकी २९ प्रकरणाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे अपहरण झालेल्या बहुतांश अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

व्यसनाधिनता आणि बेरोजगारी कारणीभूत? 

  जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीला वाढती व्यसनाधीनता आणि बेरोजगारी ही सुद्धा महत्वाची कारणे असल्याचे समोर आले आहे.  चोरी, फसवणूक, दरोडा यासारखी गुन्हे शौक पूर्ण करण्यासाठी तरुणांकडून होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. बलात्काराची बहुतांश प्रकरणे ही काही अपवाद वगळता प्रेमप्रकरणातून झाली आहेत, मात्र अपहरणाचा आकडा पोलीस प्रशासनासह साऱ्यांची चिंता वाढवणारा आहे. जिल्ह्यात गेल्या ४ महिन्यात १७ दरोड्यांचा घटना घडल्या, त्यापैकी आजपावेतो पोलिसांनी प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. याशिवाय जिल्ह्यात ४ महिन्यात ६३ दंगली झाल्याचे वृत देखील काळजाचा थरकाप उडविणारे आहे.