धक्कादायक! ट्रॅक्‍टर आडवे लावून ट्रॅव्हल्स अडवली!!; चालकाला लुटले

देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना
 
दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रॅक्टर आडवे लावून अमरावतीवरून शिर्डीला जाणारी ट्रॅव्हल्स अडवली. त्‍यानंतर चालकाला मारहाण करून लुटले. ही खळबळजनक घटना आज, ७ जानेवारीला पहाटे अडीचच्या सुमारास (मध्यरात्री) चिखली- देऊळगाव राजा रोडवरील खडकपूर्णा नदीच्या पुलावर घडली. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख इस्माईल शेख शौकत (४८, रा. चितोडा, ता. खामगाव) हे खासगी ट्रॅव्हल्सवर चालक आहेत. काल, ६ जानेवारी रोजी रात्री अमरावतीवरून शिर्डीला जाण्यासाठी ते निघाले होते. ट्रॅव्हल्समध्ये २६ प्रवाशी, एक अतिरिक्त चालक आणि क्लिनर असे एकूण २९ जण होते.

रात्री अडीचच्या सुमारास ट्रॅव्हल्स देऊळगाव महीजवळील खडकपूर्णा पुलावरून जात असताना एक ट्रॅक्टर अचानक आडवे आले. त्यामुळे चालक शेख इस्माईल यांनी ट्रॅव्हल्स थांबवली. ट्रॅक्टरवरील अंदाजे २० ते २५ वर्षीय तरुणाने चालकाला शिविगाळ केली.

तू आमच्या ट्रॅक्टरला कट का मारला, असे म्हणत ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून खाली ओढले. मारहाण करून खिशातील ५ हजार रुपये काढले. आरडाओरड एेकून क्लिनर झोपेतून उठला व दुसऱ्या चालकाला उठवत असल्याचे कळताच मारहाण करणारा तरुण ट्रॅक्टरवर जाऊन बसला व ट्रॅक्टर चालकाला "राहुल्या फास्ट चालव ट्रॅक्टर', असे म्हणत ट्रॅक्टर घेऊन  दोघे पसार झाले, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी दोन अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे करीत आहेत.