धक्कादायक! शाळेतच मुख्याध्यापकाने घेतला गळफास; जानेफळच्या श्री शिवाजी हायस्कूल मधील घटना..

 
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मेहकर तालुक्यातील जानेफळ येथून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्याध्यापकाने शाळेतील ऑफिस मध्येच गळफास घेतला. आज,२७ मार्चला सकाळी साडेअकरा वाजता ही घटना उघडकीस आली.
 रत्नाकर शिवाजी गवारे (५५) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. पावणेअकराला शाळा सुटल्यानंतर मुख्याध्यापक गवारे त्यांच्या कार्यालयातच बसून होते. साडेअकराच्या सुमारास शिपायाने येऊन बघितले असता श्री गवारे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. जानेफळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. श्री गवारे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नसले तरी कौटुंबिक कारणातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.