धक्कादायक! ग्रामपंचायतीच्या सभेत चाकू चालला!!

खामगाव तालुक्यातील प्रकार, ग्रा. पं. सदस्य महिलेला बेदम मारहाण, विनयभंग
 
अट्टल गुन्‍हेगार श्रावण निंबाळकर जिल्ह्यातून हद्दपार!; जलंब पोलिसांची कामगिरी
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुजातपूर (ता. खामगाव) येथील ग्रामपंचायतीच्या सभेत राडा झाला. ग्रामपंचायत सदस्य महिलेचा विनयभंग झाला. तिच्यावर चाकूने हल्ला झाला. बेदम मारहाण करण्यात आली. तिच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल, २७ डिसेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

सौ. विशाखा दीपक धुरंधर (३६, रा. आमसरी ता. नांदुरा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. मनोज हरिभाऊ धुरंधर, योगेश रवींद्र धुरंधर, सौ. प्रभावती रवींद्र धुरंधर, गोपाल पांडुरंग तायडे, अंबादास देविदास हिंगणे, मंगला डिगंबर बेलोकार (सर्व रा. आमसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सौ. विशाखा धुरंधर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्‍या ग्रामपंचायत सदस्य आहेत. सुजातपूर ग्रामपंचायतीची काल मासिक सभा होती.

सभेत करवसुली व जमा खर्च अहवालाचे वाचन झाले. त्‍यानंतर सौ. विशाखा धुरंधर म्‍हणाल्या, की जमाखर्च असेल तर आमच्या घरामागचे पाईप फुटले. ते दुरुस्त करा... त्‍यामुळे संतापलेल्या सौ. प्रभावती यांनी अश्लील शिविगाळ केली. वाद वाढत असल्याने सौ. विशाखा यांचे पती त्यांना घ्यायला आले, तेव्हा अंबादास हिंगणे यांनी त्यांची गाडी अडवून खाली पाडले व केस धरून ओढाताण केली. मनोज व योगेशने विशाखा यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली व त्यांच्या पतीलाही मारहाण केली.

मनोजने हातातील चाकूने विशाखा यांच्या हातावर वार केला. अंबादासने त्यांचे ब्लाऊज फाडले. गोपालने जीवे मारण्याची धमकी दिली. मंगला बेलोकार यांनी केस धरून ओढाताण करत चापटा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. ग्रामपंचायतीत आणि ग्रामपंचायतीसमोरील या राड्याने अवघे गाव हादरले असून, ग्रामपंचायतीच्या सभेत थेट चाकू चालल्याची ही पहिलीच घटना आहे. पोलिसांनी हल्लेखोर सहा जणांविरुद्ध आज, २८ डिसेंबरला पहाटे साडेबाराला (मध्यरात्री) गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक फौजदार दिनकर तिडके करत आहेत.