धक्कादायक! नवरा म्हणाला तू काळी आहेस, बायकोने गळफास घेतला; जानेफळची घटना...
Jul 3, 2024, 14:04 IST
जानेफळ(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे एका २१ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काल, २ जुलै रोजी ही घटना घडली. आज,३ जुलै रोजी विवाहितेच्या आईने याप्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीत विवाहितेच्या पती, सासू आणि नणंदेला जबाबदार धरण्यात आले आहे. सासरच्या लोकांनी विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नव्या फौजदारी पोलीस कायद्यानुसार जानेफळ पोलीस ठाण्यात हा पहिला गुन्हा दाखल झालेला आहे. रुक्मिना प्रशांत साबळे असे मृतक विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणाची तक्रार, रुक्मिनाच्या आईने जानेफळ पोलिसांकडे दिली. त्यानुसार, मृतक विवाहितेचे माहेर वाशिम जिल्ह्यातील वडप हे गाव आहे. दीड वर्षांपूर्वी रुक्मिणीचा विवाह जानेफळ येथील प्रशांत साबळे याच्याशी झाला होता. प्रशांत हा ड्रायव्हर म्हणून काम करतो. नवीन गाडी घेण्यासाठी प्रशांतसह कुटुंबातील तिघांनी रुक्मिणीचा छळ केल्याचे तिच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. 'तुझ्या आईने लग्नात हुंडा कमी दिला, तू दिसायला काळी आहेस! तुझ्या माहेरहून गाडी घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये' असे म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तिच्या मृत्यूस, पती प्रशांत साबळे , सासू लीला साबळे, ननंद लक्ष्मी साबळे हे कारणीभूत असल्याचा आरोप रुक्मिणीच्या आईने तक्रारीतून केला आहे. तक्रारीवरून जानेफळ पोलिसांनी तिघां विरोधात गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जानेफळ पोलिसांनी "बुलडाणा लाइव्हला" दिली.