धक्कादायक! रेती माफियांची हिम्मत वाढली; लोणारच्या तलाठ्यासह तहसीलच्या अधिकाऱ्यांसोबत झोंबा - झोंबी; शारा फाट्यावर मध्यरात्री घडला प्रकार!

एवढे होऊनही तक्रार द्यायला का घाबरले अधिकारी? कुणाचा दबाव की जीवाची भीती..?

 
hjk

बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात रेतीमाफियांनी अक्षरशः हैदोस  घातलाय. प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते   रेतीमाफियांना आवर घालीत असल्याचा आव आणीत असल्या तरी तरी त्या कारवायांची मुळीच भीती रेतीमाफियांना वाटत नाही. आता तर रेतीमाफियांनी हद्दच पार केली असून अवैध रेती वाहतूक रोखण्याच्या प्रयत्न करणाऱ्या लोणार तालुक्यातील एका तलाठ्यासह लोणार तहसीलच्या एका अधिकाऱ्यासोबत रेतीमाफियांनी चांगलीच झोंबाझोंबी केली. तलाठी आणि अधिकाऱ्याला धक्काबुक्की देखील करण्यात आल्याचे समजते. शेवटी रेतीमाफिया रेतीचे ट्रॅक्टर खाली करून घटनास्थळावरून पळून गेला. मात्र एवढे मोठे मॅटर होऊनही आधी गुन्हा दाखल करण्याची धडपड करणाऱ्या त्या तलाठी आणि अधिकाऱ्याने माघार घेतली..ती माघार का घेतली हाच आता चर्चेचा विषय ठरलाय..

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोणार तालुक्यातील बोरखेडी येथे अवैध रेती वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडण्यात आला. तलाठी आणि लोणार तहसीलच्या त्या अधिकाऱ्याने तो ट्रॅक्टर सुलतानपुरला आणायचे ट्रॅक्टर चालकाला सांगितले. सुलतानपूर वरून लोणार तहसील कार्यालयात ट्रॅक्टर जमा करण्यासाठी घेऊन जात असताना शारा फाट्याजवळील गतीरोधकाजवळ ट्रॅक्टर थांबला. तिथे दोन तीन मोटारसायकल वरून चार ते पाच जण आले. त्यांनी तलाठी आणि त्या अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातली..रात्री ११.१५ ते ११.३० या वेळेत इथेच चांगलीच झोंबा झोंबी झाली. तलाठी आणि त्या अधिकाऱ्याचा जीवच धोक्यात सापडला होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या प्रकारानंतर घटनास्थळीच ट्रॅक्टर मधील रेती खाली करून ट्रॅक्टर चालक व झोंबा झोंबी करायला आलेल्या त्या दुचाकीस्वारांनी पळ काढला..! 

तक्रार द्यायची भीती का?

दरम्यान या प्रकारानंतर भेदरलेल्या अधिकाऱ्यांनी पोलीस तक्रार द्यायचे ठरवल्याचे सूत्रांनी सांगितले. तशी तयारी देखील करण्यात आली. मात्र मध्येच काय झाले कुणास ठावूक..एकाएकी तक्रार द्यायचा निर्णय मागे घेण्यात आला. संबधित माफियाने दंड भरण्याची तयारी दर्शविल्याने प्रकरणाचा निपटारा झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय रेती माफियाला वाचविण्यासाठी राजकीय बळ वापरण्यात आल्याचीही चर्चा आहे. तसेच तक्रार दिल्यास काही बरे वाईट झाले तर अशी भीतीही त्या अधिकाऱ्यांना वाटली असण्याची शक्यता आहे. दरम्यान लोणार तहसीलदारांना याबद्दल विचारणा केली असता असे काही झालेच नसल्याचे त्यांनी सांगितले .दरम्यान एसीत बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी  पोलिसांत तक्रार देण्यासाठी पाठबळ दिले नाही. आम्ही सोबत आहोत असा आधार दिला नाही त्यामुळे कर्मचारी वर्गात नाराजी आहे.