धक्कादायक..! दहावीचा निकाल लागला अन् विद्यार्थ्याने गळफास घेतला; प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊनही का घेतला कठोर निर्णय? संग्रामपूर तालुक्यात आहे हळहळ

 
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव येथे धक्कादायक घटना घडली आहे. काल,२६ मे रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल लागल्यानंतर ३ वाजता एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गोकुळ प्रकाश ढेंगे(१६) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गोकुळचा काल दहावीचा निकाल होता. या निकालात गोकुळने प्रथम श्रेणीचे गुण मिळवले. दरम्यान वडील बँकेच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते तर आई खालच्या मजल्यात घरकाम करीत होती. यावेळी वरच्या मजल्यावरील टिनाच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गोकुळने गळफास घेतला. घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. गोकुळ आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. प्रथम श्रेणीचे गुण घेऊनही गोकुळने आत्महत्या का केली? आत्महत्येचे दुसरे काही कारण आहे का? याबाबतचा तपास आता पोलीस करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासला सुरूवात केली.