धक्कादायक! जिल्ह्यात ५ महिन्यांत ६० मुलींचे अपहरण; ३८ मुलींची सुटका करण्यात पोलिसांना यश; शिकण्याच्या वयात प्रेमात फसल्या होत्या; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणाले.. ​​​​​​​

 
crime

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिकण्याच्या वयात प्रेमात फसलेल्या मुलींचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या ५ महिन्यात तब्बल ६० अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तसे गुन्हे दाखल झाले आहेत.६० पैकी ३८ मुलींचा शोध लावून त्या मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात पोलिसांना यश आले आहे. ३८ पैकी ५० टक्के अधिक मुलींवर अपहरण झाल्यानंतर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.

 काही दिवसांपूर्वी चिखली शहरातील माळीपुरा भागातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते, मुलीच्या घरामागे राहणाऱ्याच एका तरुणाने तिला फुस लावून पळवून नेल्याचा तिच्या आईला संशय आहे.पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण झाल्याचे या घटनेत दिसून येत असले तरी मुलगी अल्पवयीन असल्याने अशा प्रकरणात अपहरणाचा गुन्हा पोलीस दाखल करतात. जिल्ह्यात अशाच पद्धतीच्या ६० घटना गेल्या ५ महिन्यांत घडल्या आहेत. त्यापैकी ३८ जणींचा पोलिसांनी शोध घेतला आहे.

 अपहरण झाल्यानंतर शरीराचा उपभोग..

 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्यानंतर मुलींच्या शरीराचा उपभोग प्रियकराकडून घेतल्या जातो. त्याच्यासोबत पळून जाण्यापासून तर शरीर संबध या सगळ्या बाबी बहुतांश प्रकरणात सहमतीने होत असल्या तरी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने तो बलात्कार ठरतो. त्यामुळे पीडित मुलीला शोधल्यानंतर मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर अपहरणाच्या गुन्ह्यात बलात्काराचे कलम समाविष्ट केल्या जाते. अपहरण झाल्यानंतर ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रकरणात पोलिस बलात्काराचा गुन्हा दाखल करतात.

शिवसेना टवाळखोरांना झोडून काढणार..!

 शिक्षणाच्या नावाखाली मुली क्लासेसला जातात, मात्र तिकडे त्यांचे काय सुरू आहे याकडे पालकांनी लक्ष द्यायची गरज आहे. काही टवाळखोर मुले अशा मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मुलींना कुणीही त्रास देत असेल, त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असेल तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने अशा टवाळखोरांना चांगलाच दणका देण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांनी दिला आहे.