धक्कादायक! आधी विनयभंगाची तक्रार दिली, नंतर आपसात मिटवण्यासाठी मुलाच्या वडीलाला मागीतले १० लाख; मुलाच्या वडिलांनी जीवनच संपवले; शेगाव तालुक्यातील घटना...

 
Ghjj
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील त्रितव गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल एका  १४ वर्षीय मुलाला मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार शेगाव  ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. तक्रारीवरून वैभव हिंगणे या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे, ज्या मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार देण्यात आली होती त्या मुलीच्या वडिलांनी वैभवच्या वडिलांना प्रकरण आपसात करण्यासाठी १० लाख रुपये मागितले, त्यामुळे वैभवच्या वडिलांनी आत्महत्या केली. आज १४ मार्चला ही घटना घडली. विठ्ठल शालिग्राम हिंगणे (५२) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.

  यासंदर्भात मृतक विठ्ठल हिंगणे यांची पत्नी शारदा हिंगणे यांनी आज शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून "त्या" १४ वर्षीय मुलीच्या वडिलांसह मुलीच्या कुटुंबातील ५ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल, १३ मार्चला मृतक विठ्ठल हिंगणे यांचा मुलगा वैभव विरुद्ध गावातीलच एका मुलीने तक्रार दिली होती. "शेतात जात असताना आपल्याला वैभवने अडवले, माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुला मारून टाकतो, माझ्या जीवाचे बरेवाईट करतो" अशी धमकी वैभवने दिल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले होते,शिवाय त्याने वाईट उद्देशाने हात धरल्याचा दावाही मुलीने तक्रारीत केला होता. तक्रारीवरून वैभव विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान हेच प्रकरण आपसात करण्यासाठी मुलीच्या वडिलांनी वैभवच्या वडिलांना १० लाख रुपये मागितले, पैशाचा तगादा लावल्याने वैभवचे वडील विठ्ठल हिंगणे यांनी आज शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. गळफास घेण्याआधी विठ्ठल हिंगणे यांनी पुतण्या सागर हिंगणे याला फोन केला. मुलीच्या वडिलांसह ५ जणांची नावे घेत "ते" आपल्याला प्रकरण आपसात करण्यासाठी १० लाख मागत आहेत, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, तू आता माझ्या मुलाला व बायकोला सांभाळून घे " असे सांगितले. पुतण्या सागर हिंगणे याने घडला प्रकार विठ्ठल हिंगणे यांच्या पत्नी तक्रारदार शारदा हिंगणे यांना सांगितला. शारदा हिंगणे यांच्या तक्रारीवरून "त्या" मुलीच्या वडिलांसह तिच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.