धक्कादायक! चंदनपुर हत्याकांडातील "ती" तरुणी ठरली सामूहिक बलात्काराची शिकार! नराधमांनी आधी बलात्कार केला नंतर गळा दाबून केला खून;

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा जिल्ह्यात असतानाच चंदनपुरात घडली शरमेची गोष्ट...
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील चंदनपुर येथे एका तरुणीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची बाब आज उजेडात आली होती. यासंबंधीचे सविस्तर वृत्त बुलडाणा लाइव्हने दुपारीच प्रकाशित केले होते. दरम्यान आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून त्या नराधम तरुणांनी आधी तरुणीवर बलात्कार केला व नंतर तिचा गळा आवळून खून केला असावा असा दाट संशय निर्माण झाला आहे. तरुणीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून वैद्यकीय सूत्रांनी देखील या संशयाला दुजोरा दिला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर जिल्ह्यात होत्या. महिलांवरील अत्याचारांच्या घटना कशा रोखाव्यात यासंबधी काल दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात मंथन झाले मात्र रात्री जिल्ह्यातील चंदनपुरात ही शरमेची गोष्ट घडली...
 चंदनपुर येथील अनंता इंगळे यांच्या थ्रेशर मशीन वर सोयाबीन काढण्याचे काम करण्यासाठी दोन तरुण आणि त्यांच्यासोबत एक तरुणी आली होती. अनंता इंगळे यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था शेजारच्या एका खोलीत करून दिली होती. अनंता इंगळे यांच्या गावातील एका मित्राची पुण्यात त्या तिघांशी ओळख झाली होती, आणि त्या मित्राच्या माध्यमातून काम मिळवण्यासाठी ते चंदनपुरात आले होते. ते पश्चिम बंगालचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवाय दोन तरुणांपैकी एक तरुण तरुणी आपली बहीण असल्याचे तर दुसरा आपली बायको असल्याचे सांगत होता.
 मध्यरात्री अनंता इंगळे तुरीला पाणी देऊन शेतातून घरी आले तेव्हा तरुण आणि तरुणी राहत असलेल्या घराचा दरवाजा उघडा दिसला. अनंता इंगळे यांच्या मुलाने आत बघितले असता तरुणीचा मृतदेह पडलेला दिसला तर दोन्ही तरुण गायब दिसले. त्यानंतर अंढेरा पोलिसांसह अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. एलसीबी पथकानेही घटनास्थळी पाहणी करून तपासकार्यात सहभाग घेतलेला आहे..
बलात्काराचा संशय..
दोन तरुणांपैकी एक तरुण तरुणी आपली बहीण सांगत असला तरी या प्रकरणात काहीतरी वेगळेच गौडबंगाल समोर येण्याची शक्यता आहे. तरुणीच्या चेहऱ्यावर, गळ्यावर व शरीरावर असलेले निशाण पाहता तिच्यावर एकाचवेळी दोघांकडून जबरदस्ती झाली असल्याची दाट शक्यता आहे. सामूहिक बलात्कार करून नंतर तरुणीचा गळा दाबून खून केला असावा असा दाट संशय आहे. वैद्यकीय सूत्रांनी देखील या संशयाला दुजोरा दिला आहे..सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.