खळबळजनक! खून करण्याचा असाही प्लॅन; शिवसेना शाखाप्रमुखाला चिरडण्याचा प्रयत्न! चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा....
Aug 14, 2024, 14:29 IST
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेच्या शाखाप्रमुखाचा खून करण्याचा प्लॅन रचण्यात आला. त्यासाठी वाहनाने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता या प्रकरणात चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार मोतीराम चव्हाण हे पाथर्डी येथे शिवसेना शाखा प्रमुख आहेत. घटना काल,१३ ऑगस्टची आहे. मोतीराम चव्हाण त्यांच्या दुचाकीने पारखेड फाटा येथे कामानिमित्त जात असताना पाठीमागून आलेल्या टाटा कंपनीच्या ७०९ वाहनाने त्यांना जबर धडक दिली. यामुळे चव्हाण गाडीसह खाली पडले. चव्हाण यांनी गाडीकडे पाहिले असता त्यात पंकज प्रकाश जाधव, धिरज प्रकाश जाधव, ऋतिक देविदास जाधव, विशाल रोहिदास जाधव बसलेले होते.त्यापैकी पंकज जाधव याने खाली उतरून " हा आपल्याशी नेहमी खेटे घेतो,याला कायमचे संपवून टाकू" असे म्हटले. त्यावेळी गाडीतील रोहिदास जाधव याने पुन्हा गाडी चव्हाण यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेत मोतीराम चव्हाण जखमी झालेले आहेत. त्यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.