खळबळजनक! सलमानच्या पोटात खुपसला चाकू!
Jul 22, 2024, 09:53 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वाद करणाऱ्या लोकांना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या मोहम्मद सलमानच्या पोटात ओळखीच्या व्यक्तीनेच चाकू खुपसून गंभीर जखमी केले. गुरुवारी, १८ जुलै रोजी शेगाव शहरात ही खळबळजनक घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार मोहम्मद सलमान मोहम्मद सलीम (३२ वर्ष) या जखमी युवकाने शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून, घटना ही गुरुवारी घडली. शेगाव शहरातील खळवाडी परिसरात काही लोक आपसात वाद करीत होते. यामुळे मोहम्मद सलमान यांनी मध्यस्ती करत तेथील लोकांना समजावून सांगण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी शेख रजीक हा देखील तिथे असल्याने, मोहम्मद सलमान त्याला म्हणाले की, तू मुलांना बाहेर धाब्यावर जेवायला आणतो, तसेच दारू पिण्याची वाईट सवय का लावतो? असे म्हटल्याने शेख राजीक याला राग अनावर झाला. शेख राजीक आणि मोहम्मद सलमान हे एकमेकांना परिचित आहे. पुढे, संतप्त झालेल्या राजीकने जवळील चाकू काढून थेट सलमान वर हल्ला केला. सलमानच्या पोटावर डाव्या बाजूने वार करत त्याने जखमी केले. दरम्यान, परिसरातील लोकांच्या मदतीने मोहम्मद सलमान यांना गंभीर अवस्थेत सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचार झाल्यानंतर मोहम्मद सलमान यांनी शहर पोलीस ठाणे गाठत सगळी घटना सांगितली. यावरून पोलिसांनी शेख रजीक विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहे.