खळबळजनक! मेरा खुर्द येथील राजवीर वाईन बारच्या मालकाच्या पोटात चाकू खुपसला!

 
तालुक्यातील
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथून खळबळजनक बातमी समोर आली आहे. शुल्लक कारणावरून वाईन बार चालकाला शिवीगाळ करत चाकूने वार करून जखमी केल्याची घटना काल १० जुलैच्या सायंकाळी घडली. याप्रकरणी दोन मद्यप्रेमी ग्राहकांविरोधात अंढेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मेरा खुर्द येथील शालिग्राम चव्हाण यांचे गावातच राजवीर नावाने वाईन बार आहे. बुधवार, संध्याकाळी ७ च्या सुमारास सुनील माणिकराव चव्हाण व शेख मुख्तार शेख दुपार (दोघे रा. मेरा खुर्द) हे दोघे दारू पिण्यासाठी बारमध्ये आले. शेख मुख्तार याने दारू, पाणी बॉटल आणि चकना घेतला. यावेळी त्याची राजू बाबुराव इंगळे यांच्यासोबत बाचाबाची झाली. दुकान चालक शालिग्राम चव्हाण यांनी मुख्तार याला सांगितले की, आम्ही सुनीलला बरोबर येऊ देत नाही, तू कशाला त्याला सोबत घेवून आला. असे म्हटले असता मुख्तार सुनीलला म्हणाला की, बघ रे बारवर येऊ देत नाही असे ते म्हणत आहेत. यांनतर सुनील चव्हाण याने बार चालक शालिग्राम चव्हाण यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर हॉटेलमधून बाहेर जा अशी सूचना दुकान मालक शालिग्राम चव्हाण यांनी केली असता संतापलेल्या सुनीलने खिशातून चाकू काढला आणि अचानकपणे शालिग्राम चव्हाण यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने पोटावर डाव्या बाजूला व मध्यभागी चाकूने सपासप वार केले. यात त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत होवून ते जखमी झाले असे तक्रारीत म्हटले आहे. शालिग्राम चव्हाण यांचा मुलगा वेदांत चव्हाण याने या प्रकरणी अंढेरा पोलिसांत तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी आज ११ जुलै रोजी सुनील माणिकराव चव्हाण आणि शेख मुख्तार शेख गफार या दोघां विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल हे करीत आहेत.