खळबळजनक! मतदानाच्या दिवशी खामगाव हादरलं, दारूला पैसे दिले नाही म्हणून युवकाचा धारधार शस्त्राने खून..
खामगाव शहरातील मुक्तेश्वर आश्रम परिसरामधील मंगल कार्यालयाच्या शौचालयात ही घटना घडली. दीपक जगदीश सिसोदिया असे मृतक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दीपक चा भाऊ प्रवीण सिसोदिया याने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून शहर पोलिसांनी आरोपी राजेंद्र कांडेलकर याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांना प्राप्त तक्रारीनुसार, मृतक दीपक सिसोदिया आणि त्याचे मित्र स्थानिक मुक्तेश्वर आश्रमासमोर उभे होते. त्यावेळी फरशी येथील हनुमान मंदिरा मागे राहणारा राजेंद्र कांडेलकर (२९ वर्ष) हा घटनास्थळी हातात सूरा घेऊन आला. तक्रारदार प्रवीण सिसोदिया यांचा भाऊ दीपक याला दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. दीपक ने पैसे देण्यास नकार केल्याने अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दीपक आणि त्याचा मित्र ऋषी भोलडाणे हे दोघे जवळील मंगल कार्यालयाच्या शौचालयात धावत गेले आणि लपले. त्यांनतर आरोपी राजेंद्र कांडेलकर हा तिथेही आला, त्यानी दीपकच्या छातीत सुरा भोसकला आणि गंभीर जखमी केले. या झटापटीत दीपक चा मित्र ऋषीच्या हातालाही सुरा लागला होता. यात तो जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत दीपकला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच दीपकची प्राणजोत मालवली. असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर आरोपी राजेंद्र कांडेलकर फरार झालेला होता. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर त्याला अटक झाली.