खळबळजनक!डोळ्यात मिरची पूड टाकून सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा कट उधळला! तिघांना बोराखेडी पोलिसांनी घेतले ताब्यात, दोघे अजूनही फरार..
Updated: Jun 25, 2024, 14:54 IST
मोताळा (अक्षय थिगळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) डोळ्यात मिरची पूड टाकून व चाकू हल्ला करीत सराफा व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना २२ जून रोजी घडली. याप्रकरणी गुन्हा केलेल्या पाच जणांपैकी तिघांना बोराखेडी पोलिसांनी काल २४ जून रोजी ताब्यात घेतले आहे. इतर दोघे जण फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
मोताळा तालुक्यातील वडगाव येथील सराफा व्यावसायिक राजेंद्र दुर्योधन वाघ हे २२ जूनच्या सायंकाळी दुचाकीने मोताळा येथून वडगाव येथे जात होते. दरम्यान, पुन्हई फाट्यानजीक समोरून दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी वाघ यांची दुचाकी अडविली. काही एक कारण नसताना त्यांना मारहाण केली. त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली व चाकू हल्ला करून त्यांच्याजवळील दागिन्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात राजेंद्र वाघ यांच्या कानाजवळ चाकू लागल्याने ते जखमी झाले .ठाणेदार सारंग नवलकार यांच्या नेतृत्वात पीएसआय विजयकुमार घुले, एएसआय मधुकर माळी, पोहेकॉ नंदकिशोर धांडे, दिपक पवार, नापोकाँ अमोल खराडे, पोकॉ प्रमोद साळोक गणेश बरडे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारावर संशयीत आरोपी सुपडू शाह शकुर शाह, महेश लक्ष्मण चव्हाण (दोघे रा. मोताळा) आणि एक विधिसंघर्ष बालक अशा तिघांना २४ जून रोजी ताब्यात घेतले.
त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. इतर दोन आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पुढील तपास पीएसआय विजयकुमार घुले, पोकाँ निलेश राठोड हे करीत आहेत.
'असा' फसला लुटण्याचा डाव!
२२ जूनच्या सायंकाळी पुन्हई फट्यानजीक ही घटना घडली. राजेंद्र वाघ यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पाचही लुटमार्यांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या जवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न यावेळी झाला. परंतु वाघ यांनी जोराने आवाज केला, त्यावेळी परिसरातील काही लोकं समोर आली. या लोकांना पाहून त्या पाचही आरोपींची घाबरगुंडी सुटली. अशाप्रकारे व्यापारी वाघ यांना लुटण्याआधीच सर्वांनी तेथून पळ काढला. अशी माहिती तपास अधिकारी पीएसआय घुले यांनी बुलडाणा लाइव्हला दिली.