स्कार्पिओ आडवी लावून ट्रक पळवला!

लोणार तालुक्‍यातील खळबळजनक घटना
 
बिबी पोलीस ठाणे
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्‍कार्पिओ आडवी लावून चालकाला खाली उतरवून ट्रक पळवून नेल्याची धक्कादायक घटना बिबी- मेहकर रोडवर बिबीपासून १ किलोमीटर अंतरावरील पेट्रोलपंपाजवळ १५ नोव्‍हेंबरला रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी बिबी पोलीस ठाण्यात ट्रकमालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
करण विनोद माने (२२, रा. मोर्शी जि. अमरावती, ह. मु. सोनाटी ता. मेहकर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्‍यांनी १ वर्षापूर्वी इरफान अली खान (रा. अर्धापूर, नांदेड) यांच्‍याकडून ट्रक १५ लाख ६० हजार रुपयांना विकत घेतला होता. हा ट्रक सोनाटी गावात पलसिद्ध कन्‍स्‍ट्रक्‍शनकडे कामाला लावलेला होता. ट्रकवर प्रकाश पायघन (रा. अंजनी बुद्रूक ता. मेहकर) याला चालक म्‍हणून ठेवले होते. १५ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता विटाने भरलेला ट्रक त्याच्या ताब्यात देऊन सिंदखेड राजा येथील काटे यांच्या कामावर खाली करून ट्रक सोनाटी येथे आणायला सांगितले होते. प्रकाश ट्रक( क्र. एमएच २६ एडी १८८३) घेऊन सिंदखेड राजाकडे गेला होता. रात्री सव्वा दहाला प्रकाशने माने यांना फोन करून सांगितले, की विटा खाली करून परतताना बिबीजवळ स्कार्पिओ कार आडवी झाली. त्‍यातून ३-४ जण उतरले. त्‍यांनी ट्रकच्या दरवाजाला काठी मारून धाक दाखवून त्‍याला व मजुरांना उतरवले. ट्रकची चावी हिसकावून त्‍यांच्‍यापैकी एकाने ट्रक तेथून वळवून सिंदखेडराजाकडे घेऊन गेले. माने यांनी तातडीने मेहकर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्‍यांच्या जीपमध्ये बसवून ट्रकचा शोध सुरू केला. मात्र ट्रक मिळून आला नाही. घटना बिबी पोलीस ठाण्याच्‍या हद्दीत घडल्याने बिबी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.