बुलढाण्यातील विष्णूवाडीत स्कुटीची चोरी; बरमूडावाला, हूडीवाला, हडकुळा चोर सीसीटीव्हीमध्ये कैद ! तुम्ही 'या' चोराला पाहिलय का? बातमीत पहा व्हिडिओ..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शहरातील सर्क्युरल रोड परिसरात अदिती अर्बन मुख्यालयाजवळून एकाच्या घरासमोरील ॲक्टिवा कंपनीची स्कूटी चोरून नेल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. प्रकरणी शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
याबाबत निलेश शामराव घट्टे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटना शनिवार, १८ मेच्या मध्यरात्री घडली. निलेश घट्टे यांचे सर्क्युलर रोडवरील अदिती अर्बन मुख्यालया नजीक घर आहे. शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घट्टे यांनी आपली ॲक्टिवा स्कूटी (एम.एच. २८ एपी. ०९३९ क्रमांकाची) लॉक करून घरासमोर उभी केली. दरम्यान, रात्री उशिरा जाग आल्यानंतर घरासमोर उभी केलेली गाडी बघण्यासाठी बाहेर आले असता त्यांना गाडी दिसली नाही. त्यानंतर त्यांनी त्यांची पांढरा रंग असलेली ॲक्टिवा स्कूटी परिसरात शोधली. इतरत्र खूप शोधून सुद्धा गाडी न मिळाल्याने अखेर त्यांनी २२ मे, बुधवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला. सदर चोरीची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याआधारे आरोपीचा शोध सुरू आहे.