सधन शेतकऱ्याच्या घरावर दरोडा!; दोन लाखांचा ऐवज लुटला

देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना

 
file photo

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सधन शेतकऱ्याच्या घरावर दरोडा घालून तब्‍बल २ लाख १७ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. ही घटना देऊळगाव राजा तालुक्‍यातील तुळजापूर येथे आज, २३ नोव्‍हेंबरला पहाटे समोर आली. सिंदखेड राजा पोलिसांनी दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तुळजापूर येथील सधन शेतकरी भीमराव ओमकार तिडके (६७) यांचे गावालगत शेतात घर आहे. काल, २२ नोव्हेंबरला ते कुटुंबासह घरात झोपले असताना मध्यरात्री चोरट्यांनी मुख्य गेटचे कुलूप तोडून घरात शिरले. कपाटातील सोन्याचे गंठन, नेकलेस, झुंबर, मंगळसूत्र, राणी हार असे एकूण १ लाख ७३ हजार रुपयांचे दागिने आणि नगदी ४६ हजार रुपये असा एकूण २ लाख १७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. भीमराव तिडके यांनी  सिंदखेड राजा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तपास पोलीस निरिक्षक केशव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक युवराज राठोड करत आहेत.