देऊळघाटवासियांचे रास्ता रोको आंदोलन ३ तास चालले! अखेर....

 
crowd
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बारमाही पाणीटंचाईशी मुकाबला करणाऱ्या देऊळघाटात ४ एप्रिलच्या सायंकाळी आठवर्षीय चिमुकली पाणीटंचाईचा बळी ठरली. पाणी आणण्याकरिता गेलेल्या चिमुरडीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ५ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता देऊळघाट बसथांब्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. तब्बल तीन तास हे आंदोलन चालल्याने बुलढाणा ते अजिंठा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामस्थांनी आंदोलन मागे घ्यावे, याकरिता प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली.
 

hgj

तालुक्यातील देऊळघाट येथे पाणीपुरवठा करण्यासाठी येळगाव धरणातून पूरक नळ योजना टाकण्यात आली आहे. नळ योजनेच्या माध्यमाने अनेक ठिकाणी नळ लावण्यात आले. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने मनमानी कारभार करत ही नळ योजनाच बंद पाडली. त्यामुळे ग्रामस्थांना विशेषत: महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे. दरम्यान, ४ एप्रिलला सायंकाळी ८ वर्षीय अंजली भरत शेजोळ ही मुलगी गावातील धनगर वाड्यामधील विहिरीवर आत्यासोबत पाणी आणण्यासाठी गेली होती. यावेळी तोल जाऊन ती विहिरीत पडली. डोक्याला गंभीर मार लागल्याने तिला आधी बुलढाणा व नंतर छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

ग्रामपंचायत प्रशासनासोबतच जिल्हा प्रशासन याला जबाबदार असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. परिस्थिती हाताबाहेर जावू नये, याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, बीडीओ पवार, ग्रामीणचे ठाणेदार रवींद्र देशमुख हे पोलीस कर्मचाऱ्यांसह पोहोचले.


हे आंदोलन चिघळत असल्याचे पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यशस्वी मध्यस्थी केली. दरम्यान, ग्रामसेवक प्रफुल्ल देशमुख यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवर सुरक्षितता देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. विहिरीवर तीन फूट उंच बांधकाम करून संरक्षक जाळी बसविण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. तसेच गावातील पाणीपुरवठा सायंकाळपर्यंत सुरू करण्याचे आणि आठ, दहा दिवसांत 'हर घर जल'बाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.