शेगावमध्ये सेवानिवृत्त बँक मॅनेजरचे घर फोडले!

७७ हजारांचा मुद्देमाल नेला चोरून
 
चोर
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बंद घर फोडून चोरट्यांनी सोनेचांदीच्या दागिन्यांसह ७७ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना शेगाव शहरातील एसबीआय कॉलनीतील आशिष बिल्डिंगमध्ये काल, ३ जानेवारीला सकाळी समोर आली आहे. शेगाव शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शालिग्राम किसन शेगोकार (७०) हे निवृत्त स्टेट बँक मॅनेजर आहेत. अाशिष बिल्डिंगमध्ये राहतात. चोरी झाली तेव्हा ते मुंबईला गेले होते. २८ डिसेंबरला ते मुंबईला गेले होते. काल सकाळी रेल्वेने शेगावला आले. घरी आले असता त्‍यांना समोरील दरवाजाचा कडी कोयंडा,  कुलूप तोडलेले दिसले. घरात जाऊन पाहिले असता समोरील रूममधील व बेडरूममधील कपाट व त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

पत्नीची सोन्याची पोत (किंमत ३० हजार रुपये), कानातील रिंग (किंमत ६ हजार रुपये), सोन्याच्या दोन अंगठ्या (किंमत २४ हजार रुपये), सोन्याचे मनी (किंमत ६ हजार रुपये) याशिवाय चांदीची समई, पैंजण, दिवाळीच्या पूजेसाठीच्या कोऱ्या नोटा असा एकूण ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवल्याचे दिसून आले. शेगोकार यांनी शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. इंगोले करत आहेत.