निबंधक पथकांची खामगाव, शेगावात कारवाई! सावकारांकडून आक्षेपार्ह कागदपत्रांसह ,धनादेश केला जप्त!

 
बुलडाणा: प्राप्त तक्रारीद्वारे जिल्हा निबंधक(सावकारी) पथकाने  बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव,खामगाव शहरात काल गुरूवार,१५ फेब्रुवारी रोजी तीन ठिकाणी छापा टाकला.
 त्यामधून आक्षेपार्ह ५२ कागदपत्रांसह, धनादेश(चेक) जप्त करण्यात आले आहे.

जिल्हा निबंधक कार्यालयातील प्राप्त तक्रारींच्या आधारे निबंधक तथा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांच्या आदेशानुसार सावकारी पथकाने गैरअर्जदारांच्या राहत्याघरी छापा टाकला. त्यामध्ये शेगाव येथील न्यू मोबाईल वर्ल्ड चे संचालक रवि चंदुलाल हेमनानी, रमेश चांडक तसेच खामगाव मधील संगीता सोळंके यांच्या येथे झेडपी घेतला असता त्यामधून आक्षेपार्ह नोंदी, धनादेश असे ५२ कागदपत्रे  जप्त करण्यात आली. खामगावातील दुसरे गैरअर्जदार कमलेश टावरी बाहेरगावी गेले असता घरातील तीन खोल्या व तीन कपाटे कुलूप बंद होते, त्यामुळे त्यांचा ऐवज सीलबंद करण्यात आला. वरील गैर अर्जदारांच्या घरातून संशयास्पद कोरे चेक, कोरा बॉण्ड पेपर, हिशोबाच्या नोंदी असलेले रजिस्टर जप्त करण्यात आले असून पुढील पडताळणीने महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

सदर कारवाईत  जिल्हा निबंधक ,उपनिबंधक सहकारी संस्थेच्या नियोजनात  चार पथकांची नेमणूक करण्यात आली होती. संपूर्ण कारवाई जिल्हा सनियंत्रण समिती, पोलीस अधीक्षक बुलढाणा, जिल्हा उपनिबंधक अधिकारी नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहकार विभाग, महसूल विभाग, यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी पार पाडली.