रेकॉर्डब्रेक; वर्षाच्या शेवटच्या महिन्यात जिल्ह्यातून ८२ जण गायब; १८ ते ३० वयोगटातील ३९ पोरींचा अन् २५ पोरांचा समावेश; काहींनी तिकडचं उरकल लगीन; माय - बाप शोधून शोधून थकले बिचारे

 
kkkk

बुलडाणा(अनंता काशीकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दरवर्षी दिवाळीनंतर तुळशीचे लग्न लागले की लग्नाळू मुले - मुली बेपत्ता होण्याच्या घटना वाढतात. २०२२ च्या डिसेंबर महिन्यात तर बेपत्ता होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या महिन्यात तब्बल ८२ जणांनी घर सोडून पोबारा केलाय. यात १८ ते ३० या वयोगटातल्यांचे प्रमाण अधिक आहे. १८ ते ३० या वयोगटातील ३९ जणी बेपत्ता झाल्यात तर या वयोगटातील बेपत्ता झालेल्या तरुणांची संख्या २५ एवढी आहे. बेपत्ता झालेल्यापैकी काहींनी तिकडचं लगीन उरकलं असल तरी त्यांचे माय बाप मात्र पोटच्या गोळ्यांना शोधून शोधून थकले आहेत.

लगीनसराईची लगबग सुरू झाली की बेपत्ता होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. राज्यात बुलडाणा जिल्ह्यात बेपत्ता होणाऱ्यांची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे. १८ वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती जेव्हा घर सोडून निघून जाते तेव्हा पालकांच्या तक्रारीवरून अशा प्रकरणात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात येते. मात्र गायब होणाऱ्याचे वय १८ पेक्षा कमी असेल तर अशा प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. 
   
 म्हणून संख्या वाढतेय...!
  
बेपत्ता होणाऱ्यापैकी अनेकांचे महत्वाचे कारण म्हणजे लग्न. लगिनसराई सुरू झाली की पालकांच्या वतीने मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नासाठी स्थळ शोधणे सुरू होते. मात्र पाल्यांच्या प्रेमप्रकरणाची कुटुंबीयांना फारशी माहिती नसते. माहिती झाले तरी जातीचे कारण, नोकरीचे कारण, प्रतिष्ठेचे कारण अशी अनेक कारणे सांगून पालक प्रेमविवाह करायला पाल्यांना परवानगी देत नाहीत. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून अनेक तरुणी घर सोडून पळून जाऊन प्रियकराशी लग्न करतात. इकडे त्यांचे पालक पोलीस ठाण्यात मुलगी  हरवल्याची तक्रार देतात. मात्र घर सोडणारी तरुणी किंवा तरुण सज्ञान असल्याने पोलिसांना अशा प्रकरणात काही करता येत नाही. मात्र १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच एखादी मुलगी तिच्या प्रियकरासोबत जात असेल तर अशा प्रकरणात प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. प्रियकराला मोठी शिक्षा होऊ शकते. १८ वर्षे पूर्ण व्हायला एक दिवसाचा अवधी शिल्लक असला तरी  सुद्धा अपहरणाचा गुन्हा झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.
   
  विवाहिता सुद्धा नवऱ्याला सोडून गायब..!

    केवळ अविवाहित तरुणी बेपत्ता होतात एवढेच नाही तर लग्न होऊन काही महिने, काही वर्षे झालेल्या विवाहिता सुद्धा नवऱ्याला सोडून गायब होतात. यात काही प्रकरणात दारुड्या पतीचा  आलेला राग, कौटुंबिक कलह अशी कारणे असली तरी सर्वाधिक कारणे ही प्रेमप्रकरणाची असल्याचे निदर्शनास आले आहे. लग्नानंतर काही जणी दुसऱ्या कुणाच्यातरी प्रेमात पडतात अन् नंतर नवऱ्याला सोडून त्याच्यासोबत निघून जातात.तर काही प्रकरणात लग्नापूर्वीच्या प्रियकरासोबत विवाहिता निघून गेल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत.