अल्पवयीन मुलीवर ट्रॅव्हल्समध्ये बलात्कार!; एकाला जन्‍मठेप, साथीदाराला ७ वर्षे कारावास, बुलडाणा न्यायालयाचा निकाल

 
rape
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर खासगी ट्रॅव्हल्समध्ये लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने एकाला जन्मठेपेची शिक्षा तर त्याला सहकार्य करणाऱ्याला ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पीडित मुलगी जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती देऊळगाव राजा येथे नातेवाइकाकडे आल्याची संधी आरोपीने साधली होती.

१८ ऑक्टोबर २०१८ रोजी जालना जिल्ह्यातीलच आंतरवाला येथील सय्यद जावेद सय्यद (२१) व त्याचा सहकारी याकूब ऊर्फ अशोक कारके (२०, रा. बदनापूर, जि. जालना) यांनी देऊळगाव राजा येथून पीडित मुलीला रात्रीच्या वेळेस घरातील १७ हजार रुपये व दागिने घेऊन दुचाकीवर जालना येथे नेले होते. तेथून अैारंगाबाद, ठाणे व तेथून सुरत येथे खासगी प्रवासी बसद्वारे नेले होते.

सुरत येथे जात असताना एका ट्रॅव्हल्समध्येच सय्यद जावेद सय्यद हमीद याने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले होते. पीडित मुलीच्या वडिलांनी १८ ऑक्टोबर २०१९ रोजी देऊळगाव राजा येथील पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करत दोन्ही आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. सरकारी पक्षातर्फे एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडिता, मुलीची आई, मावशी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली होती. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपी सय्यद जावेद सय्यद हमीद यास जन्मठेपेची शिक्षा व त्याचा सहकारी याकूब ऊर्फ अशोक कारके यास ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एस. पी. हिवाळे यांनी प्रभावीपणे युक्तीवाद केला. प्रकरणाचा तपास देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बसवराज तमशेट्टी यांनी केला होता. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. साळवे यांनी सहकार्य केले.