दगडाने ठेचून नव्हे तर गळा आवळून झाला राधिकाचा खून! मारणाऱ्याने जमिनीच्यावर दगडाची पाळ रचली, त्याखाली दाबला राधिकाच्या मृतदेह;

शवविच्छेदन करायला बुलडाण्यात आणले; तपासावर "एसपीं"ची नजर! पोलीस शोधतायेत "या" प्रश्नांची उत्तरे..
 
vhghg
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील रोहडा येथील  तपोवन देवी मंदिराच्या मागील आवारात राधिका इंगळे या ६ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आज आढळून आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राधिका तिच्या आई वडिलांसोबत चिखली तालुक्यातील तांबुळवाडी येथे तिच्या आईच्या नातेवाईकांच्या घरी लग्नाला आली होती..दरम्यान राधिकाच्या खून करणाऱ्या नराधमाने अतिशय नृशंस पद्धतीने हत्या केल्याचे समोर येत आहे. राधिकाचा दगडाने ठेचून नव्हे तर रुमालाने गळा आवळून खून केल्याचे समोर आले. 
 

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तामसी या गावची राधिका तिच्या आई वडिलांसह तांबुळवाडी येथे ११ मे रोजी लग्नासाठी आली होती. १२ मे रोजी हे लग्न चिखली तालुक्यातील रोहडा येथील तपोवन देवी संस्थान येथे होते. लग्नासाठी केलेल्या गाड्यांमधून १२ मे रोजी सकाळी ११ वाजता राधिका तिच्या आईसह तपोवन देवी संस्थान येथे पोहचली. सव्वाअकराच्या सुमारास ती मंदिर परिसरातून गायब झाली. तिच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच शोधाशोध करण्यात आली, मात्र सगळीकडे शोध घेऊनही राधिका नजरेस पडली नाही. दरम्यान ही वार्ता पसरताच घाईघाईने लग्न लावण्यात आले. राधिकाच्या आईने एकच हंबरडा फोडला होता. अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दौरा होता. घटनेचे गांभीर्य कळताच दुपारी ४ च्या सुमारास ठाणेदार गणेश हिवरकर, पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला.
   
रात्री ३ पर्यंत शोध घेतला पण..
  
मुलीच्या नातेवाईकांनी, पोलिसांनी ,गावकऱ्यांनी मंदिर परिसरात सगळीकडे राधिकाचा शोध घेतला. रात्री ३ वाजेपर्यंत राधिकाचे कुटुंबीय नातेवाईक तिचा शोध घेत होते,मंदिराच्या मागील भागात शोध घेतलाही मात्र तरीही राधिका सापडली नाही..

 दगडाची पाळ रचली, रुमालाने गळा आवळला...
 
आज सकाळपासून पुन्हा परिसरात शोध सुरू होता. पोलिसांच्या एका पथकाला मंदिराच्या मागच्या बाजूला  डोंगराळ भागात दगडांची एक पाळ रचलेली दिसली, तिथे दुर्गंधी येत असल्याने पोलिसांचा संशय बळावला..पोलिसांनी दगड उचलून बघितले असता छोट्या छोट्या दगडांच्या खाली राधिकाचा मृतदेह आढळला. चेहऱ्यावर देखील छोटे छोटे दगड ठेवलेले होते, रधिकाचा रुमालाने गळा आवळेला होता, रुमाल देखील तिच्या गळ्याभोवती फास लावलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. 
   
 खून करणारा नराधम कोण?

राधिका तपोवन देवी परिसरात पहिल्यांदाच आली होती.  तांबुळवाडी येथील लगीनघरच्या मोजक्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांशिवाय दुसऱ्या कुणाला ओळखत नव्हती. त्यामुळे ज्याला तो ओळखत नव्हती त्या व्यक्तीसोबत ती जाईल कशी असाही प्रश्न तपासादरम्यान पोलिसांना पडणार आहे. तांबुळवाडीवरच्या लगीनघरून  आलेल्या पहिल्याच गाडीत ती तिच्या आईसोबत पोहचली, त्यानंतर तीच गाडी पुन्हा दुसऱ्या पाहुण्यांना आणायला तांबुळवाडीला गेली असे सांगण्यात येत आहे. राधिकाचा खून करण्याचा हेतू काय असावा? खुनी तिच्या परिचयातला होता की अनोळखी? खून करणाऱ्या नराधमाने बलात्कार किंवा तसे काही करण्याचा प्रयत्न केला का याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. प्रथमदर्शनी बलात्कार झाल्याचे दिसत नसले तरी शवविच्छेदन अहवालानंतर नेमके काय ते समोर येईल असे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलताना सांगितले.प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राधिकाचा मृतदेह बुलडाणा येथे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणलेला आहे. रात्री ९ पर्यंत शवविच्छेदन करण्यात आलेले नव्हते,ते आता उद्या, १४ मे च्या सकाळी करण्यात येणार आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शवविच्छेदन "इन कॅमेरा" होण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक तपासावर लक्ष ठेवून आहेत. अंढेरा पोलिसांचे पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक यांच्यासह ४ पथके तपास करीत आहेत. या प्रकरणाचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.