पोलिसांनी त्‍या ६६ जणांची काढली हिरोगिरी!

स्वतः ठाणेदार बुलडाण्यात दंडुका घेऊन रस्त्यावर!
 
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विना नंबरप्लेट किंवा फॅन्सी नंबर टाकून वाहने "धूम' पळविणाऱ्यांची हिरोगिरी बुलडाणा जिल्ह्यात पोलिसांनी  उतरवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी अशा मंडळीविरुद्ध मोहीम तीव्र केली असून, आज, १३ नोव्‍हेंबरला स्वतः ठाणेदारच रस्‍त्‍यावर कारवाईसाठी उतरल्याचे चित्र बुलडाणा शहरात दिसून आले. पोलीस ठाण्यासमोर चिखली रोडवर ते दंडुका घेऊनच उभे होते. त्‍यांना पाहून अशा मंडळींची होणारी पळापळ सुरू झाली. दिवसभरात बुलडाणा शहरात ६६ जणांवर कारवाई करत १६६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


दसरा, दिवाळीला गाड्यांची खरेदी केल्यानंतर काही दिवसांच्या आत आरटीओ कार्यालयाकडून वाहन नोंदणी करणे नियमाप्रमाणे बंधनकारक असते. मात्र बरेच जण या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. याशिवाय वाहनांच्या नंबर प्लेटवर दादा, राजे असे शब्द नंबरच्या माध्यमातून लिहिण्याचा ट्रेंडही वाढला आहे. नियमानुसार नंबर प्लेटवरील नंबर हा सहज वाचता यावा व सगळ्यांना कळेल असा असणे बंधनकारक आहे. नंबर प्लेट वर नंबरव्यतिरिक्त दुसरे कोणतेही चित्र छापणे  गुन्हा आहे. असे प्रकार करणाऱ्यांवर आज कारवाईचा फास आवळण्यात आल्याचे दिसून आले. कारवाई केलेल्या ६६ वाहनांपैकी ५८ जणांना दंड वसूल करून सोडून देण्यात आले. ८ जणांनी दंड न भरल्याने वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केली आहे. कारवाईत ठाणेदार प्रदीप साळुंके  यांच्यासह एपीआय श्री. अहिरराव, एपीआय नीलेश लोदी, पोहेकाँ लक्ष्मण कटक, पोहेकाँ महादेव इंगळे, पोहेकाँ दिलीप पवार, पोहेकाँ रमेश पवार, पोहेकाँ विनोद गायकवाड, नापोका सुनिल किनगे, पोकाँ नाजुकराव वानखेडे यांनी भाग घेतला.