धाड नाका दणाणून टाकणारा डीजे पोलिसांनी उचलून आणला ठाण्यात!; बुलडाण्यातील कारवाईने डीजेमालकांत खळबळ

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धाड नाक्‍यावरील मंगल कार्यालयांत सध्या लग्नांची धूम आहे. मात्र या लग्नांत बोलाविण्यात येणाऱ्या डीजेमुळे सध्या या भागातील नागरिक त्रासून गेले आहेत. कारण डीजेचा आवाज मर्यादेबाहेर असतो. त्‍यावर नृत्‍य करणाऱ्यांचा झिंगाटही नागरिकांनाही त्रासदायक ठरत आहे. विशेष म्‍हणजे एकीकडे ओमिक्रॉनचे सावट आहे. तरीही अशाप्रकारे निर्बंध पायदळी तुडवले जात असताना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकही संताप व्यक्‍त करत होते. अखेर काल, २९ डिसेंबरला रात्री दहानंतरही सुरू असलेला डीजेचा दणादणाट पोलिसांनीच हस्तक्षेप करून बंद केला आणि डीजेचे वाहन सरळ पोलीस ठाण्यात आणून जमा केले.

ज्‍येष्ठ मंडळी, रुग्ण, लहान मुलांना डीजेच्या दणादणाटामुळे त्रास होतो. मात्र याकडे दूर्लक्ष करत मंगल कार्यालयांच्या छत्रेछायेखाली सर्रास नियमांचे उल्लंघन धाड नाका भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मागेही काही नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. बुलडाणा लाइव्हकडेही अनेकांनी फोन करून याविषयावर वृत्त प्रसिद्ध करण्याची विनंती केल्याने बुलडाणा लाइव्हने वृत्तही प्रसिद्ध केले होते. त्‍यानंतर बुलडाणा शहर पोलिसांनी शहरात अशाप्रकारे मर्यादेबाहेर डीजे वाजविणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.

काल धाड नाका परिसरातून पुन्हा तक्रारी आल्याने पोलिसांच्या पथकाने धाड नाका गाठले. एका मंगल कार्यालयासमोर डीजेचा दणदणाट सुरू होता. पोलिसांनी डीजे जप्त केला. ते वाहन पोलीस ठाण्यात आणून जमा केले आहे. डीजे मालक विनायक नारायण नप्ते (रा. चौथा, ता. बुलडाणा) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरिक्षक नीलेश लोधी आणि सहायक पोलीस निरिक्षक जयसिंग पाटील यांनी ही धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईमुळे डीजे मालकांत खळबळ उडाली असून, यानंतर तरी ते किमान मर्यादेत राहून डीजे वाजवतील, अशी अपेक्षा सामान्यांकडून व्यक्‍त होत आहे. पोलिसांनीही अशा प्रकारे कारवाया सुरू ठेवल्यास त्‍यांच्या मनमानीला आळा बसेल, अशी मागणी होत आहे.