'साहेब' गावातल्या रस्त्याकडेही जरा लक्ष असू द्या! खामगाव तालुक्यातील पातोंडा -पेडका गावात जाणाऱ्या 'मुख्य' रस्त्याची लागली वाट!

 
खामगाव
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):पातोंडा (पेडका) या गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था रस्त्याला पडलेल्या खड्यांमुळे अतिशय बिकट झाली आहे. मात्र संबंधित प्रशासनाला काहीही घेणे देणे नसल्याचे चित्र दिसत आहे.
खामगाव तालुक्यातील पातोंडा (पेडका) हे गाव मुख्य रस्त्यापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. गावात जवळपास तीन हजाराहून अधिक लोक राहतात. गावातून बाहेरगावी शिक्षण घेण्यासाठी दररोज तीनशेहून अधिक विद्यार्थी खाजगी बस, ऑटो ने प्रवास करतात. गावात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पातोंडा (पेडका) गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान होत आहेच, तर अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. तरीही संबंधित प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे. तेच शहरातील रस्ते बघितले तर थोडा जरी खडा पडला तर लगेच त्या रस्त्याची मरंमत्त करून तो खड्डा बजावला जातो. मात्र शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था कितीही बिकट होवू दे, प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे गावकऱ्यांकडून साहेब गावातही लोक राहतात हो, इकडेही जरा लक्ष असु द्या. अशी मागणी होत आहे.