पठ्ठ्याला पाहिजे होते ४ लाख अन् साखरेचं पोतं!१ लाखाची लाच घेतली,पण लाज नाही वाटली! बोराखेडीचा ग्रामसेवक पवारची एसीबीने उतरवली पावर!

 
7yryrh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  विवाह नोंदणीच्या कागदपत्राची माहिती देण्यासाठी ४ लाख रुपये व १ साखरेचं पोतं मागणाऱ्या मोताळा तालुक्यातील बोरखेडी येथील ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला ( ग्रामसेवकाला) १ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.३१ जानेवारीला हा सापळा रचण्यात आला. रामचंद्र गुलाबराव पवार (५४) ग्रामपंचायत बोराखेडी ता. मोताळा जि. बुलडाणा असे या लाचखोराचे नाव आहे.

शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात सामान्य नागरिकांची कामे लाच दिल्याशिवाय होत नसल्याचे प्रकार नेहमीच उघडकीस येतात.आता तर रोख रकमेसह थेट साखरेचे पोतं ही मागितल्याचे समोर आले आहे. बक्कळ पगार असूनही, कर्मचारी,अधिकारी लाच मागत असल्याचे दुर्दैव आहे. मोताळा तालुक्यातील बोराखेडी ग्रामपंचायत येथे ग्राम विकास अधिकारी रामचंद्र गुलाबराव पवार यांच्या कडे एका तक्रारदाराने २००८ या वर्षातील  विवाह नोंदणीच्या कागदपत्रांची माहिती मागितली होती. या संदर्भातील अर्ज देखील देण्यात आला होता. मात्र अर्जावरून माहिती देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष ४ लाख रुपये व १ साखरेचे पोतं अशी लाचेची मागणी केली. तडजोडी नंतर पवार यांनी २ लाख १ हजार रुपयांची मागणी रेटली. या रकमेपैकी १ हजार रुपये तात्काळ फोन पे द्वारे पवार यांनी स्वीकारले. उर्वरित रकमेपैकी १ लाख रुपये तात्काळ घेऊन येण्यास पवार यांनी सांगितले.

दरम्यान तक्रारदाराने प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती. त्यामुळे बुलडाणा ते चिखली मार्गावरील नागरे ठेकेदार यांच्या बंगल्यासमोरील गाळा क्रमांक ८, सुंदरखेड येथे सापळा रचण्यात आला. या सापळा कारवाईत ग्रामविकास अधिकारी रामचंद्र पवार रंगहाथ अडकले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात श्याम भांगे, विलास साखरे, मोहम्मद रिजवान, प्रवीण बैरागी, जगदीश पवार,विनोद लोखंडे, सुनील राऊत,रवींद्र दळवी, स्वाती वाणी यांनी केली.