बिबी ग्रामीण रुग्णालयात 'रुग्ण' येतात, पण डॉक्टरच गायब! ग्रामस्थांनाच नाही तर पोलिसांनाही होतो त्रास..

 
बिबी
बिबी (जयजित आडे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) लोणार तालुक्यातील बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच नसल्याने सर्वसामान्य नागरिकांनाच नाही तर पोलिसांना देखील त्रास भोगावा लागत आहे. गोरगरीब ग्रामस्थांचे हाल होत असून नाईलाजाने खाजगी रुग्णालयाकडे त्यांचे पाय वळालेत. 
बिबीच्या ग्रामीण रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टरच येत नाही? असे तिथल्या ग्रामस्थांनी वेळोवेळी बोलून दाखवले आहे. गावातील आजारी व्यक्तींचा उपचारासाठी मोठी दमछाक होत आहे. अनेक आजाराने ग्रस्त असलेल्या ग्रामस्थांना कसेबसे पैसे जमवून खाजगी दवाखान्यात जावे लागते.
ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सुविधा अतिशय ढासळल्याची भीषण चित्र आहे. एवढेच नाही तर, बिबी ग्रामीण रुग्णालय १५ ते २० गावांना जोडले गेले असून समृद्धी महामार्गाला लागून आहे. समृद्धीच्या नागपूर-मुंबई मार्गावर विविध प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. विश्रांती साठी थांबलेल्या प्रवासांना लुटण्यात येणे, शेतीचे वाद, चोरी अशा विविध घटना या परिसरात घडून गेल्यात. हा भाग बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने फिर्यादी, आरोपी यांची वैद्यकीय तपासणी इथल्या ग्रामीण रुग्णालयातच करावी लागते. परंतु बिबीच्या ग्रामीण रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टरच हजर राहत नाही. यामुळे गोरगरीब जनतेसह पोलिसांनाही त्रास सहन करावा लागतो.
आरोपी घेऊन तालुक्याच्या ठिकाणी न्यावे लागतात. शासनाची गाडी करून आरोपींसोबत अधिकचे कर्मचारी पाठवावे लागतात. यामुळे पुढील कारवाईला वेळही होतो. असा त्रास पोलिसांना होत आहे. बीबी ग्रामीण रुग्णालय एमबीबीएस प्रतीक्षेत आहे. रुग्णालय प्रशासनाच्या वरिष्ठांकडून लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे. अशी आशा परिसरातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.