मुलाच्या शिक्षणासाठी पै- पै पैसे जमविले, पण वाईट घडलं! चिखलीत कुटुंबावर कोसळले मोठे संकट..
 Jul 10, 2024, 10:07 IST
                                            
                                        
                                    चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मुलाच्या शिक्षणासाठी पै- पै जमविलेले पैसे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना चिखली शहरातील राऊतवाडी परिसरात घडली. यातून मेटकर कुटुंबीयावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. 
                                    
   संतोष वामनराव मेटकर व त्यांचे कुटुंब घरामध्ये झोपलेले असताना ८ जुलैच्या रात्री बारा वाजेपासून ते ९ जुलैला पहाटे पाच वाजेपर्यंत अज्ञात चोरटे घराशेजारील बेडरूम समोर आले. खोलीचे लॉक तोडून घरात मुलाच्या शिक्षणासाठी ठेवलेले तीन लाख रुपये व ३९ हजारांचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. एकूण ३ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल चोरी झाल्याने मेटकर कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. घटना उघडकीस येताच पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत बुलढाणा येथून डॉग स्कॉड तसेच फिंगरप्रिंटचे नमुने घेण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले. प्रकरणी संतोष वामनराव मेटकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
 
                                    
 
                            