संतापजनक! मुलगा पाहिजे म्हणून मारत होते टोमणे;विवाहितेला १२ दिवस अन्न पाण्यावाचून ठेवले! बिचारीचा मृत्यू झाला तरी नवरा मोबाईलवर गेम खेळत होता ! खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजारात क्रूरपणाचा कळस..

 
guiugi
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): क्रूरपणाचा कळस काय असतो? खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथे घडलेला हा प्रकार वाचून तुमचा संताप अनावर होईल.....मुलगा पाहिजे.. मुलगा पाहिजे असे टोमणे मारत विवाहितेचा सातत्याने छळ करण्यात आला. तिला तब्बल १२ दिवस अन्न पाण्यावाचून उपाशी ठेवले. ती आजारी होती मात्र तिला औषधे सुद्धा देण्यात आली नाही.अखेर बिचारीचा मृत्यू झाला.. क्रूरपणाची हद्द म्हणजे बायकोचा मृत्यू झाला हे माहीत झाल्यावरही तिचा क्रूर नवरा मात्र मोबाईलवर गेम खेळत होता. विवाहितेच्या भावाने तसे धक्कादायक आरोप केले आहेत.

 पुनम श्रीकांत भोरे(३२, रा. भालेगाव बाजार, ता.खामगाव) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. मृतक पुनमचा भाऊ पवन रमेश नवथळे (२९, रा.जळगाव जामोद) याने याप्रकरणाची तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पुनमच्या पतीसह सासू ,सासरा व नणंद विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार १८ मे २०१७ ला पुनमचे लग्न खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजारच्या श्रीकांत भोरे याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही दिवस चांगले वागवल्यानंतर शुल्लक कारणावरून पुनमचा छळ होऊ लागला. पुनम गावात ब्युटी पार्लर चे क्लासेस घेत होती. त्यावरून त्याचे पैसे आम्हाला दे असा तगादा तिच्याभोवती लावण्यात येत होता असा आरोप पुनमच्या भावाने केला आहे. पुनमला एक मुलगी झाली होती, मात्र तिचे नीट पोषण सासरच्या लोकांनी केले नाही म्हणून ११ महिन्याची असताना मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मात्र पुनमभोवती आता मुलगा पाहिजे असा तगादा सातत्याने सुरू होता. त्यात तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येऊ लागला. 

   २ फेब्रुवारीच्या रात्री २ वाजता पुनमने भावाला फोन केला. माझी तब्येत बरी नाही, १० - १२ दिवसांपासून उपाशी असल्याचे तिने सांगितले. तातडीने पूनमचा भाऊ भालेगाव बाजार येथे पोहचला. त्यावेळी पूनम बेडवरून खाली पडलेली होती. पूनमच्या भावाने तातडीने उपचारासाठी अकोला येथील आयकॉन हॉस्पिटल मध्ये हलवले. पूनमच्या भावाने पूनमच्या नवऱ्याला देखील सोबत घेतले. दरम्यान ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ७ च्या सुमारास पुनमचा मृत्यू झाला.

यावेळी बायकोचा मृत्यू झाला तरी पूनमच्या नवऱ्याला काही देणे घेणे नसल्यासारखे तो वागत होता, हॉस्पिटल मध्ये तिचा नवरा मोबाईल वर  गेम खेळत होता असा आरोप तक्रारदार भावाने केला आहे. पुनमचा मृत्यू झाल्याचे कळताच तिचा नवरा हॉस्पिटल मधून फरार झाला. डॉक्टरने दिलेल्या अहवालात देखील पूनम च्या पोटात अन्नाचा कण नसल्याचे सांगितले असल्याचे तक्रारदार भावाने म्हटले आहे. पुनमचे पार्थिव घ्यायला सासरचे लोक आले नाहीत त्यामुळे तिचा अंत्यविधी माहेरी करण्यात आला. २२ फेब्रुवारीला याप्रकरणी तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.