Amazon Ad

संतापजनक! दारुड्या मुलाचे दुष्कृत्य ; दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आईचे केस ओढले, लाता बुक्क्यांनी बदडले, गज मारला! चिखलीची घटना..

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरातून संतापजनक बातमी समोर येते आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याने जन्मदात्या आईलाच मारझोड करत जखमी केल्याची घटना ११ जून रोजी समोर आली. आईच्या तक्रारीवरून चिखली पोलीसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 प्राप्त माहितीनुसार, चिखली शहरातील एकता नगर भागात प्रमिला दिलीप गायकवाड ह्या पती व मुलगा राजू व त्याच्या कुटुंबासह राहतात. त्या लोकांच्या घरी जाऊन धुणी भांडी करण्याचे काम करतात. राजू काहीच कामधंदा करत नसून त्याला दारू पिण्याची वाईट सवय आहे. दारुसाठी पैसे मागत तो घरी सतत वाद घालतो. दरम्यान, १० जूनच्या दुपारी प्रमिला गायकवाड या कामे आटोपून घरी आल्या होत्या. संध्याकाळी ५:३० वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा राजू दारू पिऊन आला. दारू पिण्यासाठी तो पैसे मागू लागला, तू काही कामधंदा करत नाही, व नेहमी दारू पिण्यासाठी पैसे मागतो असे त्यांची आई प्रमिला गायकवाड ह्या त्याला म्हणाल्या. यातून संतापलेल्या राजूने स्वतःच्या आईला शिवीगाळ केली, केस ओढले व लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीमुळे त्याची आई प्रमिला गायकवाड अतिशय घाबरून गेल्या होत्या. त्या घराबाहेर पळत सुटल्या, तेव्हा राजूने जखमी करण्याच्या उद्देशाने हातात गज घेतला. यात प्रमिला गायकवाड यांना डोक्याला दुखापत होऊन त्या जखमी झाल्या आहेत. असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी चिखली पोलीस स्टेशन गाठून सगळी हकीकत सांगितली. चिखली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दारुड्या राजू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.