अपघातात ऑटोमधील एक ठार, दोघे गंभीर

अज्ञात वाहन रात्री उशिरा धडक देऊन पसार झाले..!, लोणार तालुक्‍यातील भीषण दुर्घटना
 
file photo
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)  ः अज्ञात वाहनाने ऑटोला धडक दिली. यात ऑटोतील एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना काल, २ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास लोणार- मंठा मार्गावरील वडगाव तेजन (ता. लोणार) येथील बसथांब्याजवळ घडली.

तुकाराम ज्ञानबा सोनुने (३०, रा. देऊळगाव वायसा, ता. लोणार) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच गावाचे शिवानंद तातेराम सोनुने (३५) व वैभव लक्ष्मण सोनुने (२५) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तुकाराम, शिवानंद आणि वैभव हे तिघे वडगाव तेजन येथून ऑटोने देऊळगाव वायसा येथे परतत होते.

नातेवाइकाला सोडण्यासाठी ते काल रात्री वडगाव तेजन येथे गेले होते. तिथून परतताना अज्ञात वाहनाने ऑटोला जबर धडक दिली.अपघातानंतर धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले. जखमींना रुग्णवाहिकेने तातडीने बुलडाणा येथे हलविण्यात आले. मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तिथून औरंगाबादला हलविण्यात आले आहे. लोणार पोलीस तपास करत आहेत. मृतक तुकाराम सोनुने यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.