मेहकरात एसटी बसने चिरडले;एकाचा जागीच मृत्यू; एसटी चालक म्हणे ब्रेक फेल झाले! बस आगारात कशी काय जाऊन थांबली?

 
crime
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर शहरात काल रात्री एसटी बसने ७० वर्षीय वृद्धाला चिरडले. वृद्धाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बस थेट मेहकर आगारात जाऊन थांबली. पोलिसांनी चालकाला जाब विचारल्यावर ब्रेक दिला फेल झाल्याचे उत्तर चालकाने दिले. दरम्यान ब्रेक फेल झाले होते तर बस बरोबर आगारात जाऊन कशी काय थांबली असा सवाल आता उपस्थित केल्या जात आहे.
 

 रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बुलडाणा आगाराची बस (एम एच ०६, एस.८४०४) बुलडाण्यावरून मेहकरला जात होती. मेहकर बस स्थानकापासून काही मीटर अंतरावर बसने रस्त्याने सायकल घेऊन जाणाऱ्या वृद्धास चिरडले. विष्णू तुकाराम शिंदे(७०) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव असून ते मेहकर नगरपालिकेचे माजी कर्मचारी होते. ते विवाहित नव्हते,त्यांच्या मागेपुढे कोणताही परिवार नाही. शहरातून ते नेहमी सायकलवर फिरायचे.डाळ आणि दुधाची पिशवी घेऊन ते घराकडे जात होते.त्याचवेळी त्यांनी बसने धडक दिली.अपघातास कारणीभूत ठरलेल्या बसचालकाचे नाव अशोक मारोती वानखेडे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मेहकर पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करीत आहेत.