दीड लाखाची रोकड घरातून गायब!; शेतकरी झाला हैराण

प्लॉट घेण्यासाठी काढले होते बँकेतून पैसे, जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना
 
चोर
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्लॉट घेण्यासाठी बँकेतून काढून घरी ठेवलेले १ लाख ६८ हजार रुपये चोरट्याने लांबवले. कपाटातील लॉकरमधून हे पैसे चोरीस गेले असून, आडोळ (ता. जळगाव जामोद) येथील ८० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने या प्रकरणी काल, १७ डिसेंबरला जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दशरथ कचरू ससाणे यांना मुलांसाठी प्लाॅटची खरेदी करायची होती. त्‍यासाठी त्‍यांनी बँकेतून पावणेदोन लाख रुपये काढून आणले होते. प्लॉट खरेदीत चालढकल सुरू असल्याने ते पैसे त्‍यांनी घरातील लोखंडी कपाटातील छोट्या लॉकरमध्ये ठेवले होते. त्‍यातील ७ हजार घरखर्चासाठी काढल्यानंतर उरलेले पैसे लॉकरमध्येच होते. १६ डिसेंबरला नातवासाठी मुलगी बघायला जायचे असल्याने ते पैसे घेण्यासाठी गेले असता त्‍यांना लॉकरमध्ये पैसे दिसून आले नाहीत. कुणीतरी कपाट उघडून पैसे गायब केल्याची तक्रार त्‍यांनी पोलिसांत केली. ही घटना ८ डिसेंबर ते १६ डिसेंबरच्या दरम्‍यान घडल्याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.