शिवजयंतीला बुलडाण्यात आक्रित घडलं! एकीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष प्यायचा प्रयत्न केला; दुसरीकडे मिरवणुकीत नाचतांना तरुणाच्या छातीत चाकू मारला..

 
Tgyu
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने यंदा बुलडाणा शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवकालीन शस्त्रप्रदर्शनी,खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते झालेले उद्घाटन,व्याख्याते शिवरत्न शेटेंचे व्याख्यान, १९ फेब्रुवारीला विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सायंकाळी निघालेली भव्य शोभायात्रा.. या धामधुमीत २ घटना पोलिसांचे टेन्शन वाढवणाऱ्या घडल्या. नांदुरा तालुक्यातील एका बलात्कार पीडित महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने पोलिसांनी वेळीच आवरल्याने पुढील अनर्थ टळला. दुसरीकडे धाड नाक्यावर मिरवणुकीदरम्यान नाचतांना एका तरुणाच्या छातीत अज्ञात व्यक्तीने चाकू मारला. जखमी तरुणाला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार नांदुरा तालुक्यातील एका महिलेने नांदुरा पोलीस ठाण्यात पतीसह स्वतःच्या कुटुंबातील काही सदस्यांवर बलात्कार व कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हाही दाखल केला होता. मात्र आरोपींना पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप महिलेने केला होता. आरोपींना अटक करावी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या ठाणेदारांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी पीडित महिलेने केली होती, अन्यथा १९ फेब्रुवारीला विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा महिलेने दिला होता.

दिलेल्या इशाऱ्यानुसार सायंकाळी पाचला पीडित महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचली. तिच्या हातात विषाची बाटली होती. त्याचवेळी गोपनीय विभागाचे पोलिस कर्मचारी श्री.डुकरे, श्री.साखरे, श्री घुगे यांनी महिलेला ताब्यात घेत विषाची बाटली जप्त केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला असल्याने आरोपींना पोलीस अटक करू शकले नाहीत.
   
नाचता नाचता छातीत वार...!

  दरम्यान दुसऱ्या घटनेत घडले असे की, बुलडाणा शहरातील धाड नाका परिसरात शिवजयंतीची मिरवणूक सुरू होती. डीजेच्या तालावर तरुण नाचत होते. याच गर्दीत विकास एकनाथ काकडे(२५,रा. जुनागाव,बुलडाणा) हा तरुणही नाचत होता. नाचता नाचता त्याच्या छातीवर गर्दीतून कुणीतरी चाकूहल्ला केला. विकासचे शर्ट रक्ताने भिजल्याने त्याच्या एका मित्राच्या लक्षात आले. तातडीने विकासला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात. मात्र जखम गंभीर असल्याने विकासला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले. मिरवणुकीच्या गर्दीत विकासला चाकू कुणी मारला हे मात्र अद्याप समोर आले नाही.