ओ शेठ तुम्‍हाला महागात पडलाय केक!

बुलेट रस्त्यावर आडवी लावून वाढदिवस, पुढे काय झाले वाचा... मेहकर शहरातील घटना
 
file photo
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्त्यावर गाडी आडवी लावून केक कापण्याची व वाढदिवसाचे सेलेब्रिशन करण्याची हल्ली फॅशनच बनली आहे. मात्र सार्वजनिक रस्त्यावर बुलेट आडवी लावून बर्थ डे सेलिब्रेशन करणाऱ्या शेठला मेहकर पोलिसांनी चांगलाच धडा शिकविला. सार्वजनिक रहदरीला अडथळा निर्माण केला म्हणून ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१४ नोव्हेंबर रोजी ओम श्रीराम गायकवाड (रा. बालाजीनगर, मेहकर) याचा २९ वा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासासाठी ओमच्या मित्रांनी सेलिब्रेशनचा बेत आखला. मेहकर-डोणगाव रोडवरील शहरातील इंद्रप्रस्थ चौकात मित्र जमले. रस्त्याच्या मधोमध विना नंबर प्लेटची बुलेट आडवी लावली व गाडीवर केक ठेवून वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. मात्र हे सेलिब्रेशन सुरू असताना पोलिसांचे पेट्रोलिंग करणारे वाहन तिथे आले. रस्ता अडविल्यावरून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत मेहकर पोलीस ठाण्यात आणले. बर्थ डे बॉय ओम गायकवाड याच्यासह त्याचे मित्र हर्षल रामभाऊ कुसळकर (२९, रा. रामनगर, मेहकर), विनोद पुंडलिक जाधव (२९, रा. रामनगर,मेहकर) व पवन सुरुशे (२९, रा. बालाजीनगर,मेहकर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.