चंदनपुर खून पकरणात नवीन अपडेट! आरोपींना १८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी;आरोपींची भाषा पोलिसांना कळत नसल्याने लढवली नवी शक्कल;खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट!
प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता; ठाणेदारांच्या कार्यपद्धतीवर हिंदु संघटना नाराज,"लव्ह जिहाद" चे प्रकरण असल्याचा दावा...
Updated: Oct 17, 2023, 11:06 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री परप्रांतीय मुलीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील चंदनपूर येथे घडली होती. खून करणारे तरुण तरुणीच्या सोबतचेच होते.घटनेच्या २४ तासांत पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. मळणी यंत्रावर मजुरी करू म्हणून नावे बदलून चंदनपुर येथे आश्रय मिळाल्याचे तपासात समोर आले आहे. चंदनपूर येथील थ्रेशर मालक शेतकरी यांना आरोपी तरुणांनी त्यांची नावे रजत उर्फ राहुल आणि छोटू अशी सांगितली होती. मात्र पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींची नावे अलीमोद्दिन मिया आणि जाकीर उल दायी अशी असल्याचे व आरोपी हे पश्चिम बंगालच्या दक्षिण मिदनापुर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. दरम्यान काल,१६ ऑक्टोबरला पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींपैकी एक असलेल्या जाकीर उल दायी याने मुलीला पळवून आणले होते. मात्र आरोपींनी तिचा खून का केला असावा याबद्दल अजूनही कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. आरोपींची चौकशी करतांना आरोपींची भाषा समजत नसल्याने चौकशीत पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी बंगाली भाषेचे ज्ञान असणारा दुभाषक पुण्यावरून बोलवला आहे. आज आणि उद्या या दुभाषकाच्या माध्यमातून पोलीस आरोपींची चौकशी करतील आणि त्यातून खुनाच्या कारणाचा उलगडा होईल अशी शक्यता आहे.दरम्यान मुलींच्या कुटुंबीयांबाबत अद्याप स्पष्ट माहिती पोलिसांना मिळालेली नसल्याचे ठाणेदार विकास पाटील यांनी सांगितले. मुलींच्या कुटुंबीयांना आणण्यासाठी पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगालला रवाना झाले आहे,आज दिवसभरात मुलींच्या कुटुंबियांबद्दल माहिती मिळण्याची श्यक्यता असल्याचेही ते म्हणाले.
हिंदू संघटनांनी ठेवले तपासावर बोट.. दरम्यान आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. हे लव्ह जिहाद चे प्रकरण असल्याचा दावा हिंदु संघटनांकडून केल्या जात आहे. पोलिसांनी आरोपींना लवकर अटक केली असली तरी तपासात गंभीर चुका केल्याचा आरोपी हिंदुत्ववादी संघटनांकडून होत आहे. एवढे गंभीर प्रकरण असताना पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करतांना व्हिडिओ शूटिंग केले नाही. महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत पंचनामा केला नाही. घटनेच्या दिवशी खून झालेल्या मुलीबद्दल फारशी माहिती नसतांना पोस्टमार्टम करण्याची घाई केली. एवढ्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी इन कॅमेरा पोस्टमार्टम का केले नाही असे सवाल आता हिंदुत्ववादी संघटनांकडून उपस्थित केल्या जात असून ठाणेदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकल हिंदु समाजाच्या वतीने याविषयाला धरून आंदोलनाची तयारी सुरू आहे..
ठाणेदार म्हणतात हा तपासाचा भाग...
दरम्यान यासंदर्भात उपस्थित होत असलेले प्रश्न बुलडाणा लाइव्ह ने थेट ठाणेदार विकास पाटील यांनाच विचारले. यावेळी त्यांनी हा तपासाचा भाग असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
आतापर्यंत काय काय घडल..ठाणेदार सांगतात! पहा व्हिडीओत...