अंबाशी हत्याकांडाचे गूढ उकलले!; दोघांविरुद्ध अशी झटापट झाली अन्‌ तो दोघांना पुरून उरत हत्‍या झाली!!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः युवकाचा धारदार शस्‍त्राने खून करण्यात आल्याची घटना काल, ३ डिसेंबर रोजी अंबाशी (ता. चिखली) येथे समोर आली होती. काल रात्री उशिरा खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली असून, तो नांद्रकोळी (ता. बुलडाणा) येथील संजय भीमराव जाधव (३०) असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्‍याच्‍या खून प्रकरणी संशयित म्हणून सव (ता. बुलडाणा) येथील गोपाल लव्हाळे (२५) याला काल सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा त्याने खुनाची कबुली दिल्याचे समोर आले. झटापटीत खून झाल्याचे गोपालने कबूल केले.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, नांद्राकोळी येथील भारत गजानन विरसिद (२८) आणि संजय जाधव २ जानेवारीच्या संध्याकाळी मोटारसायकलीने चिखलीला गेले होते. सव येथील गोपाल लव्हाळे याच्याकडे स्विफ्ट डिझायर कार असून, तो ती भाड्याने देत असतो. चिखलीत गेल्यानंतर भारत विरसिदने गोपालला फोन केला. माझी बायको आजारी आहे. तिला दवाखान्यात न्यायचे आहे. तुझी गाडी भाड्याने पाहिजे, असे सांगून त्याने गोपालला अंबाशी फाट्यावर बोलावले.

भारत आणि संजय हे गोपालच्या कारमध्ये बसले. अंबाशीवरून काटोड्याकडे जात असताना त्‍यांनी शौच लागली म्हणून गोपालला गाडी थांबवायला सांगितली. गोपालच्या हातातील अंगठी आणि सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न संजय आणि भारतने केला. भारतने चाकूचा धाक दाखवत गोपालला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत गोपालने भारतच्या हातातील चाकू हिसकावला आणि संजयवर वार केले.

संजय रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे दिसताच भारत घटनास्थळावरून पसार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना अंबाशी येथील प्रकाश देशमुख यांच्या शेतात मृतदेह दिसल्याने घटना उघडकीस आली. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, चिखलीचे ठाणेदार अशोक लांडे यांनी धाव घेतली. पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचवेळी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सव येथून गोपालला ताब्यात घेतले.

मात्र त्याच्याशी झटापट करणाऱ्या दोघांना तो ओळखत नसल्याने मृतदेहाची ओळख पटत नव्हती. गोपालच्या मोबाइलवर आदल्या रात्री आलेल्या मोबाइल नंबरच्या आधारे रात्री ११ वाजता चिखली पोलीस नांद्रकोळी येथे पोहोचले. त्यानंतर मृतकाची ओळख पटली. तो संजय भीमराव जाधव असल्याचे समोर आले. चिखली पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.