रेतीमाफियांची मुजोरी! घरासमोरून रेती वाहने नेण्यास विरोध करणाऱ्या तरुणाला विष पाजले!!; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

 
file photo
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेतीची वाहतूक करणाऱ्यांना घरासमोरून वाहन नेण्यास विरोध केल्याने २४ वर्षीय तरुणाला तिघांनी घरात घुसून विष पाजले. काल, ११ जानेवारीला पहाटे जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव खुर्द येथे हा धक्कादायक प्रकार घडला. सध्या तरुणावर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी काल रात्री उशिरा तरुणाच्या भावाने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोळेगाव खुर्द येथे सूरज गजानन पांडे पत्नीसह राहतो. त्याचा मोठा भाऊ शिवाजीने दिलेल्या तक्रारीनुसार, सूरजच्या घरासमोरील रस्त्यावरून रेती वाहतूक करणारे लोक वाहनात रेती भरून घेऊन जातात. त्यामुळे सूरजच्या घरात धूळ जात होती. ट्रॅक्टरने रेती वाहतूक करणाऱ्या गावातीलच बाळकृष्ण दुलाजी नाईक (५५), पुंडलिक रामभाऊ घुळे (५३) व रतन दुलाजी नाईक(५०) यांना घरासमोरून रेती घेऊन जाऊ नका. माझ्या घरात धूळ येते, असे म्हणत सूरजने विरोध केला होता.

त्यामुळे काल पहाटे तिघांनी सूरजच्या घरात घुसून त्याला जबरदस्ती विषारी औषध पाजले. आरडाओरड एकूण सूरजचे वडील व भाऊ धावत आल्याचे दिसताच तिघांनी पळ काढला. अत्यावस्थेत सूरजला आधी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जळगाव जामोद पोलिसांनी बाळकृष्ण नाईक, पुंडलिक गोळे व रतन नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.