मोटारसायकल चोरणारी गँग जेरबंद! तब्बल ४२ मोटारसायकलींसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त! बुलडाणा LCB ची धडाकेबाज कारवाई

 
Ps
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : निर्जन ठिकाणी लावण्यात आलेल्या दुचाकिंची चोरी करुन कमी किमतीत विकणाऱ्या चौघांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यातील एक बुलडाणा जिल्ह्यातील तर इतर जळगांव खा. व मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्हयात होणाऱ्या दुचाकिंच्या चोरीचे खान्देश आणि मध्यप्रदेश कनेक्शन असल्याने लक्षात आले आहे.
 शत्रुघ्न सोळंके (२८वर्ष) रा.जळगाव जामोद, गंगाराम पवार (२० वर्ष) रा. मुक्ताईनगर, तुळशीराम पवार (२४वर्ष), तर सिताराम मुजाल्दे (२४वर्ष), अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल ४२ दुचाकीसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.प्राप्त माहितीनुसार, आरोपींमध्ये असणारा शत्रुघ्न सोळंके १५ डिसेंबर रोजी चोरी केलेल्या दुचाकीसह मोताळ्यात असल्याची गोपनीय माहिती टीम एलसीबी ला मिळाली. दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यानंतर कारवाई दरम्यान दूचाकी चोरट्यांची टोळी समोर आली. निर्जन ठिकाणी लावण्यात आलेल्या दुचाकी चौघे चोरी करायचे त्यांनतर त्या कमी किमतीत विक्री करत असे. इतकच नाही तर या टोळीने बुलडाणा, जळगाव, नाशिकसह मध्य प्रदेशात देखील दुचाकींची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने चारही आरोपींना उद्या गुरुवार, (दि.२१ डिसेंबर) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
यांनी केली कारवाई...!
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे, निलेश सोळंके, पोलीस उपनिरीक्षक, श्रीकांत जिंदमवार , पोलीस अंमलदार रामविजय राजपूत, दशरथ जूमडे, दिपक लेकुरवाळे, दिगंबर कपाटे, जगदेव टेकाळे, गणेश पाटील, पुरूषोत्तम आघाव, अनंत फरतडे, दिपक वायाळ, मनोज खर्डे, चालक पोकॉ विलास भोसले, सुरेश भिसे, सायबर पो.स्टे. चे राजु आडवे, अमोल तरमळे, संदीप शेळके व योगेश सरोदे यांनी केली आहे.
पोलिसांचे नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन..
ठिकठिकाणी घडणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे. नागरिकांनी आपली दुचाकी सीसीटीव्ही कॅमेराच्या परिसरात लावावी, गाडी लॉक करण्यासाठी चावीचा वापर करावा, तसेच विना कागदपत्राची गाडी खरेदी करू नये. शिवाय खरेदी विक्रीचा कारभार संशयास्पद वाटल्यास ती माहिती स्था. गु. शाखेकडे द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे.