मोहोळ उठले, सोबत सव्वा लाख घेऊन गेले!

वैद्यकीय अधिकाऱ्याचा डोक्‍यावर हात!!, खामगाव शहरातील घटना
 
thief
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगावच्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्‍हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनंता पेसोडे यांचे समर्थनगरातील घर चोरट्यांनी साफ केले आहे. दागदागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १ लाख २७ हजार ४११ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. ही घटना आज, १७ नोव्‍हेंबरला सकाळी समोर आली.

डॉ. अनंता भानुदास पेसोडे (२४) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. ते समर्थनगरात आई, वडील, लहान भाऊ ईश्वर यांच्यासह राहतात. त्‍यांच्या घरामागे इंगळे राहतात. त्यांच्या घराच्या खिडकीला गेल्या एक महिन्यापूर्वी आग्या मोहोळ लागले होते. हे मोहोळ उठवून देण्यासाठी काॅलनीतीलच रहिवासी अंबादास जाधव यांनी त्यांच्या ओळखीचे श्रीकृष्ण ठक (रा. शिर्ला नेमाने) यांना बोलविले होते. त्यामुळे डॉ. पेसोडे यांनी घराची सर्व दारे बंद करून त्याला कुलूप लावून फक्त बाहेरील गेट मोहोळ उठविणारे ठक यांना जाण्या- येण्यासाठी उघडे ठेवले होते.

काल, १६ नोव्हेंबरला सायंकाळी ते कुटुंबासह गावी पिंप्राळा (ता. खामगाव) येथे निघून गेले. आज सकाळी साडेसहाला ते परतले असता घराला कुलूप दिसले नाही. सर्व दरवाजे उघडे होते. घरातील लोखंडी कपाटही उघडे होते. त्यातील सर्व सामान कपडे खाली अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरट्यांनी सोन्याची अंगठी, सोन्याचा गोफसह अन्य दागिने रोख १० हजार रुपये चोरून नेले होते. मोहोळ काढणाऱ्या लोकांवरच डॉक्‍टरांना संशय आहे. तसे त्‍यांनी तक्रारीतही म्‍हटले आहे.