भाजीपाला खरेदी करताना मोबाइल चोरणाऱ्यास रंगेहात पकडले!; खामगावातील घटना

 
जवळच्या मित्रांकडूनच विश्वासघात; मोबाइल हातात घेतला अन्‌ त्‍याचा केला “कार्यक्रम’!; खामगाव शहरातील घटना
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजीपाला खरेदी करत असताना मोबाइल चोरणाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. ही घटना खामगाव शहरातील टिळक मैदानावरील बब्बू पठाण यांच्या भंगारच्या दुकानासमोर काल, ९ जानेवारीला सकाळी १० च्या सुमारास घडली.

कैलास विश्वनाथ डोंगे (५६, रा. खामगाव रायगड काॅलनी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. ते जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहेत. त्‍यांच्याकडे सॅमसंग कंपनीचा ५ हजार रुपयांचा मोबाइल आहे. भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेले असता चोरट्याने त्‍यांच्या वरच्या खिशातून अलगद मोबाइल काढला. मात्र त्‍याचवेळी डोंगे यांच्या ही बाब लक्षात आली. त्‍यांनी चोरट्याचा हात पकडून चोर चोर अशी आरडाओरड केली.

यावेळी नागरिक जमले. चोरट्याला त्‍याचे नाव, गाव विचारले असता त्‍याने शेख इकबाल शेख अब्बास (२९, रा. अंबिकानगर वाशिम बायपास अकोला) असे सांगितले. जमलेल्या लोकांच्यादेखत त्‍याने चोरलेला मोबाइल परत केला. नागरिकांनी त्‍याला पोलीस ठाण्यात आणले.  खामगाव शहर पोलिसांनी त्‍याच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.