सैलानी यात्रेत वाहनाने चिरडल्याने मनोरुग्ण महिलेचा मृत्यू!
Mar 28, 2024, 12:42 IST
सैलानी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भर यात्रेमध्ये रात्रीच्या वेळी वाहनाने धडक देऊन चिरडल्याने एका मनोरुग्ण महिलेचा मृत्यू झाला. २६ मार्चच्या सकाळी ही घटना उघडकीस आली.
ललिताबाई नामदेव सोनकांबळे (४७) असे मृत महिलेचे नाव असून, ती नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात येणाऱ्या नर्सीजिगळा गावची रहिवासी होती. मनोरुग्ण असल्याने ती तेरा वर्षांपासून सैलानीत राहायची. सैलानी बाबांचा धावा केल्याने व्याधी बरी होते, असा समज असल्याने नातेवाइकांनी तिला सैलानीत ठेवले होते. भिक्षा मागून ती उदरनिर्वाह करायची. दरम्यान, सध्या सैलानी बाबांची मोठी यात्रा भरली आहे. या यात्रेत बहिणीला भेटण्यासाठी तिचा भाऊ सुभाष निवृत्ती राक्षसमारे (भीमवाडी, जि. नांदेड) हा २३ मार्च रोजी आला होता. २६ मार्च रोजी सकाळी सात वाजता तो सैलानी बाबांच्या दर्ग्याकडे दर्शनासाठी जात असतानाच त्याला हाशम मुजावर यांच्या शेताजवळील नाल्यानजीक एका महिलेचा मृतदेह पडलेला असल्याचे समजले. घटनास्थळी जावून पाहणी केली असता बहीण ललिताबाई सोनकांबळे हिचाच मृतदेह असल्याचे त्याने ओळखले. अज्ञात वाहनचालकाने धडक देऊन चिरडल्याने तिचा मृत्यू झाल्याची तक्रार रायपूर पोलिसांत देण्यात आली.