मेहकर अर्बन बँकेत डल्ला मारणारच होते, पण सतर्क नागरिकामुळे फसला दोन चोरट्यांचा प्लॅन!!; मेहकर शहरातील घटना

 
file photo
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर येथील कॉटन मार्केट रोडवरील मेहकर अर्बन बँक फोडण्याचा अयशस्वी प्रयत्‍न समोर आला आहे. काल, ६ जानेवारीला रात्री साडेदहाच्या सुमारास बँकेच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून दोन चोरट्यांनी चोरीचा प्रयत्‍न केला. पण तिथून जाणाऱ्या नागरिकांच्या वेळीच ही बाब लक्षात आली. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(छायाचित्रात संशयित चोरीचा प्रयत्न करताना रंगेहात पकडलेला संशयित.)

बँकेचे व्यवस्‍थापक संतोष पंडीतराव महाजन (रा. गणपती गल्ली मेहकर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. काल रात्री दहाच्या सुमारास दोन चोरटे बँकेच्या चॅनेल गेटचे कुलूप तोडून आत शिरले. पण तिथून जाणाऱ्या सतर्क नागरिकाने त्‍यांना हटकले.

नंतर ते पुढे जात असताना काहीतरी तोडल्याचा पुन्हा आवाज झाल्याने सतर्क नागरिकांनी तातडीने बँकेचे लेखापाल सागर देशमुख यांना कॉल केला. लेखापाल देशमुख तातडीने बँकेकडे धावले. तोपर्यंत नागरिकांनी चोराला पकडून ठेवले होते. त्‍याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

व्यवस्‍थापक श्री. देशमुख बँकेत आले. यादरम्‍यान जो चोरटा पकडून ठेवला होता. त्‍याने हाताला हिसका देऊन पळ काढला. मात्र पकडल्यानंतर त्‍याचे छायाचित्रे बँक कर्मचाऱ्यांनी काढून ठेवले आहे. एक लोखंडी गज बँकेजवळ टाकलेला दिसून आला असून, कुलूप तुटलेले दिसल्याचे श्री. देशमुख यांनी पोलिसांतील तक्रारीत म्‍हटले आहे.