१६ वर्षांच्या मुलीचे लग्न लावले; नवरदेवासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मोताळा तालुक्‍यातील घटना

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात आज, १ जानेवारी रोजी नवरदेवासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राजूर (ता. मोताळा) येथील रामेश्वर महादेव मंदिरात हा विवाह १३ डिसेंबरला झाला होता. याप्रकरणी आज, १ जानेवारीला राजूर येथील ग्रामसेवक विष्णू देवमन इंगळे यांनी तक्रार दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही माळविहीर (ता. बुलडाणा) येथील आहे. ती बुलडाण्यात मावशीकडे राहत होती. १३ डिसेंबरला राजूर येथे बालविवाह पार पडणार असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार पथक तिथे गेले असता लग्नसोहळा उरकण्यात आला होता. मुलीचे आधारकार्ड दाखवून मुलीचे वय १९ वर्षे असल्याचे सांगण्यात आले होते.

पथकाने विवाह झाल्याचा पुरावा म्हणून फोटोसुद्धा काढले.त्यानंतर चौकशीत शाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलीची जन्मतारीख ११ सप्‍टेंबर २००५ असल्याचे समोर आले. बोनाफाईड सर्टिफिकेट आणि जन्मपत्रावरून मुलीचे वय १६ वर्षे असल्याचे समोर आले. त्यामुळे चौकशीअंती आज दिलेल्या तक्रारीनुसार नवरदेव विलास पाटील, नवरदेवाची आई आशा विलास पाटील, नवरदेवाचे वडील कैलास विलास पाटील (तिघे रा. रताळी, ता. मेहकर), अल्पवयीन मुलीचे वडील, मुलीची आई आणि लग्न लावणारा पुजारी गजानन मांडवेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या समुपदेशक शारदा पवार, चाईल्ड लाईन बुलडाणाच्या संध्या घाडगे, प्रवीण गवई, शीतल पवार यांनी केली. तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.