चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ; मेहकर तालुक्‍यातील घटना

 
file photo
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चारित्र्याच्या संशयावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा अतोनात छळ केला. सासू गरम सराट्याने विवाहितेच्या अंगाला चटके देत होती. नवरा बेदम मारहाण करत होता. माहेवरून केवळ २० हजार रुपये आणण्यासाठी विवाहितेच्या आई- वडिलांना सुद्धा शिविगाळ करण्यात येत होती. सासरी जगणे मुश्किल झाल्याने विवाहिता माहेरी गेली आणि वाशिम शहर पोलीस तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या तब्बल ११ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जानेफळ (ता मेहकर) येथे सासरी नांदत असताना हा छळ झाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

सौ. वर्षा अनिल दुतोंडे (३०, रा. जानेफळ, ह. मु. वाशिम) या विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली. जानेफळ येथील अनिल माणिक दुतोंडे याच्यासोबत जून २००६ मध्ये वर्षाचे लग्न झाले होते. लग्नानंतर सासरी वर्षा एकत्र कुटूंबात नांदत होती. लग्नानंतर सुरुवातीचे एक वर्ष तिला चांगले वागविले. मात्र नंतर पती अनिलला दारूचे व्यसन लागले. तो विनाकारण वर्षाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. हातात जे पडेल त्याने तो पत्नीला मारहाण करत होता.

लोखंडी सराटा गरम करून वर्षाच्या अंगाला चटके देत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. सासू- सासरे, नणंद, नंदोई, दीर हेसुद्धा अनिलला वर्षाबद्दल एकाचे दोन सांगत होते व भडकावून देत होते. सासरचे लोक तुला मुलगीच का झाली या कारणावरून मारहाण करत होते. जिवाने मारण्याच्या धमक्या देत होते, असेही तक्रारीत म्‍हटले आहे. वर्षाने याप्रकरणी २०१७ मध्येसुद्धा मेहकर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती.

मात्र तरीही सासरच्या लोकांच्या वागणुकीत बदल होत नव्हता. माहेरवरून २० हजार रुपये आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते. मात्र आई- वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ती सासरच्या मंडळींची पैशाची मागणी पूर्ण करू शकली नाही. छळ असह्य झाल्याने वर्षा सध्या माहेरी वाशिम येथे राहते. समझोता करण्याचा प्रयत्न होऊन समेट न झाल्याने तिने काल, ९ जानेवारी रोजी वाशिम शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून वर्षाचा पती अनिल माणिक दुतोंडे, सासरा माणिक तुकाराम दुतोंडे, सासू वत्सलाबाई दुतोंडे, दीर सुनील माणिक दुतोंडे (सर्व रा. जानेफळ, ता. मेहकर) यांच्यासह सासरच्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.