झेंडू ५० रुपये किलो; उत्पादकांची दिवाळी आनंदात!

बुलडाण्याच्या बाजारात २ हजार क्विंटल झेंडू दाखल
 
 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी यंदा आनंदात जाईल. शेतकऱ्यांच्या शेतातून व्यापारी ५० रुपये प्रतिकिलो या दराने झेंडू खरेदी करीत आहेत. त्यामुळे खुल्या बाजारातही आज झेंडूला ६० ते ७० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे.

दसरा आणि दिवाळीला झेंडूच्या फुलांना बाजारात चांगली मागणी असते. घराला तोरण बांधण्यासाठी, वाहनाची पूजा करण्यासाठी झेंडूच्या फुलांना अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे ताज्या आणि टवटवीत झेंडूचे दर सध्या वाढले आहेत. उद्या, ४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन असल्याचे झेंडू खरेदीसाठी बाजारात नागरिक धाव घेत आहेत. बुलडाणा शहरात आज, २ हजार क्विंटल झेंडूची फुले विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. उद्या संध्याकाळपर्यंत हे दर कायम राहिल्यास झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळीसुद्धा आनंदात जाणार आहे.

शेतकरी म्‍हणतात...
झेंडूला यंदा चांगला भाव मिळत आहे. मात्र आज जो भाव मिळत आहे तो उद्या संध्याकाळपर्यंत  मिळाला तर जास्त चांगले होईल. झेंडू तोडण्यासाठी लागणाऱ्या मजुरांनाही दिवाळीसाठी पैसे द्यायचे असल्याने झेंडूला चांगला दर मिळतोय याचा आनंद आहे.
- गणेश चव्हाण, शेतकरी, चिखली