पाणी भरताना पुरुषांमध्ये वाद, शेजाऱ्याने डोक्यात हाणले राफ्टर! खामगाव शहरातील घटना..

 
Gbvv
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) पाणी भरताना महिलांमध्ये वाद झाल्याची घटना नेहमी समोर येते,परंतु दोन पुरुषांमध्ये वाद होवून मारहाण झाल्याची घटना खामगाव येथे रविवारी घडली. याप्रकरणी मारहाण झालेल्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला.  
खामगाव शहरातील शिवाजी वेस परिसरात राहणारे सुनील नारायण वेरुळकर यांनी तक्रार दिली की, रविवारी नळावर पाणी भरण्याकरता गेले असता त्यावेळी शेजारी गजानन ओंकार श्रीनाथ हे पाणी भरत होते. त्यांचे पाणी भरणे झाल्यानंतर नळाला पाईप लावून घरी घेऊन जात असताना वेरूळकर म्हणाले की, मला वाघळी येथे जायचे आहे, त्यामुळे मला पाणी भरू दे पाईप काढू नको.
त्यानंतर घरासमोर पाणी भरण्यासाठी गेले असता गजानन श्रीनाथ हे हातामध्ये राफ्टर घेऊन आले आणि पाणी भरण्याच्या कारणावरून वाद करू लागले. 'तुझे पाणी भरणे झाले आता माझ्यासोबत वाद करू नको ' असे वेरूळकर यांनी म्हटले असता गजानन श्रीनाथ यानी हातातील राफ्टर डोक्यावर मारून जखमी केले. असे तक्रारीत म्हटले आहे. अशा तक्रारीवरून पोलिसांनी गजानन ओंकार श्रीनाथ (६० वर्ष) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.